स्वखर्चाने उभारला विसर्जन घाट
By Admin | Updated: September 1, 2014 17:10 IST2014-09-01T02:19:20+5:302014-09-01T17:10:25+5:30
येथील कोहजगांव ग्रामस्थांनी एकत्रित येऊन चिंचपाडा येथील तलावावर गणेशविसर्जनासाठी स्वखर्चाने घाट उभारला आहे

स्वखर्चाने उभारला विसर्जन घाट
पंकज पाटील, अंबरनाथ
येथील कोहजगांव ग्रामस्थांनी एकत्रित येऊन चिंचपाडा येथील तलावावर गणेशविसर्जनासाठी स्वखर्चाने घाट उभारला आहे. या ठिकाणी अंबरनाथ पश्चिमेतील बहुसंख्य गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने भाविकांना फायदा होणार आहे.
चिंचपाड्यातील तलावाची देखरेख पूर्वीपासून कोहजगावातील ग्रामस्थच करीत आले आहेत. तलाव पात्रात स्वच्छ पाणी असल्याने दरवर्षी अनेक भाविक या ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी आणतात. वेगाने नागरीकरण होत असल्याने या परिसरात गृहसंकुले मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी गणेशविसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याआधी येथील भाविकांना विसर्जनापूर्वी आरती करण्यासाठी कट्टा नसल्याने चिखलातच किंवा एखाद्या खडकावर मूर्ती ठेवून आरती करावी लागत होती. तसेच तलावाकडील मार्गावर चिखल तुडवतच भाविकांना विसर्जन करावे लागत होते. भाविकांची ही समस्या लक्षात घेऊन बांधकाम सभापती प्रदीप पाटील यांनी रामदास पाटील, अरुण पाटील, उमेश पाटील, सुरेंद्र पाटील आणि इतर काही ग्रामस्थांना विश्वासात घेऊन येथे ग्रामस्थांच्या स्वखर्चाने गणेशघाट उभारण्याचे काम केले आहे.
इतकेच नव्हे तर संपूर्ण परिसराचे सपाटीकरण करून तिथे वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा तयार केली आहे. हा परिसर वनखात्याच्या अखत्यारीत असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. मात्र गणेशभक्तांसाठी ही सोय असल्याने त्या कामाचे स्वागत आता परिसरातील नागरिक करीत आहेत. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हा परिसर हरित करण्याचा प्रयत्नही ग्रामस्थांनी सुरू केला आहे. हे काम करीत असताना विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ताही गावकऱ्यांनी स्वखर्चाने दुरुस्त केला आहे.