सर्व्हे नीरंक, तरीही साथ रोगाचा उद्रेक!
By Admin | Updated: May 28, 2014 13:01 IST2014-05-28T01:06:20+5:302014-05-28T13:01:00+5:30
अकोला आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह लागले असून जिल्ह्यातील २३६ गावे जोखीमग्रस्त!

सर्व्हे नीरंक, तरीही साथ रोगाचा उद्रेक!
अकोला : पावसाळ्य़ाच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात साथ रोगाच्या उद्रेकाची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागातर्फे सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत २३६ गावे जोखीमग्रस्त असल्याचे दर्शविण्यात आले. असे असले तरी साथ रोगाच्या उद्रेकाची स्थिती मात्र नीरंक दर्शविण्यात आल्यानंतरही जिल्ह्यात दोन गावांमध्ये साथ रोगाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. अकोला जिल्ह्यातील मागील दहा वर्षांत ज्या गावांमध्ये साथ रोग आणि जलजन्य आजाराची लागण झाली होती, अशा गावांचा सर्व्हे मे महिन्यात करण्यात आला. यात सातही पंचायत समितीअंतर्गत येणार्या ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३६ गावे जोखीमग्रस्त असल्याचे आढळून आले. या सर्व्हेमध्ये २३६ गावांमधून ३६१ पाणी नमुने घेण्यात आले. याशिवाय ६८२ रक्त नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्यात आली. ५ सिरम नमुने घेण्यात आले होते. हा सर्व प्रयोग सुरू असताना जिल्ह्यात एकही गोवरचा रुग्ण आढळून आला नाही. सर्व्हेच्या निकषानुसार जिल्ह्यात मलेरिया किंवा डेंग्यू यासारख्या कीटकजन्य आजारांची लागण होईल, असे डास आढळून आले नाही.