तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे राहणारे लोक अचानक गायब झालेत. नाही ना? पण कॅनडामधील एक गाव याच गोष्टीसाठी गेल्या ८९ वर्षांपासून रहस्य बनलेलं आहे. त्यावेळी इथे अंजिकुनी तलावाच्या किनाऱ्यावर एक गाव होतं. पण हे गाव आणि त्यातील लोक अचानक गायब झाल्याचं बोललं जातं. आजपर्यंत हे रहस्य कायम आहे की, या गावातील लोक अचानक गेले कुठे?
या गावातील लोक गायब होण्यावरून एक कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की, १९३० मध्ये 'जो लाबेल' नावाची एक व्यक्ती भटकत भटकत या गावात पोहोचली होती. त्यावेळी हिवाळा होता, त्यामुळे तो गरम ठिकाणाच्या शोधात या ठिकाणी पोहोचला होता. तो याआधीही या गावात आला होता आणि त्यामुळे त्याला माहीत होतं की, इथे काहीना काही व्यवस्था होईल.
जेव्हा ही व्यक्ती गावात पोहोचली तेव्हा मदतीसाठी त्याने लोकांना आवाज दिला. पण त्याला त्याच्या आवाजाशिवाय दुसऱ्या कुणाचाही आवाज ऐकायला आला नाही. चारही बाजूने केवळ भयान शांतता होती. त्याला तिथे ना कुणी मनुष्य दिसला ना प्राणी.
लाबेलने चारही बाजूने नजर फिरवली तेव्हा त्याला कुणीच दिसलं नाही. त्याने विचार केला की, येथील लोक दुसऱ्या ठिकाणी गेले असतील. तो थंडीपासून वाचण्यासाठी एका घरात घुसला. घरात गेल्यावर त्याने पाहिलं की, घरातील सगळं साहित्य व्यवस्थित होतं. किचनमध्ये अर्ध शिजलेलं अन्न पडून होतं आणि चुलही पेटत होती. असं वाटत होतं की, आत्ताच कुणातरी जेवण तयार केलं.
लाबेल फार घाबरलेला होता. तो लगेच त्या घरातून बाहेर पडला आणि दुसऱ्या घरात गेला. तिथेही त्याला तेच चित्र दिसलं. आता तो अधिक घाबरला होता. त्यामुळे तो तिथून पळाला.
गावातील सर्वच घरांची स्थिती एकसारखी होती. असं वाटत होतं की, लोक त्यांचं काम अर्धवट सोडून कुठे गायब झालेत. लाबेलने गावाबाहेर येऊन या रहस्यमय घटनेची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर चौकशी सुरू झाली. पण पोलिसांनाही याची काहीच माहिती मिळाली नाही की, गावातील लोक नेमके अचानक गायब कुठे झालेत.
पोलिसांनी आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांची विचारपूस केली. त्यातील काही लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिथे एक अजब चमकदार प्रकाश पडला होता. हा प्रकाश सतत आकार बदलत होता आणि लागोपाठ अंजिकुनी गावाकडे सरकत होता. पण याची काहीही अधिकृत माहिती नाही. पण आजही हे रहस्य कायम आहे की, या गावातील सगळे लोक अचानक गायब कुठे झालेत.