साडेतीन वर्षाच्या मुलाला शिक्षिकेने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण
By Admin | Updated: July 23, 2014 18:48 IST2014-07-23T18:47:56+5:302014-07-23T18:48:11+5:30
कोलकाता येथे एका शिक्षिकेने साडेतीन वर्षाच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी अमानूष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

साडेतीन वर्षाच्या मुलाला शिक्षिकेने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण
ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. २३ - कोलकाता येथे एका शिक्षिकेने साडेतीन वर्षाच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी अमानूष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अमानूष मारहाणीचा जाब विचारणा-या मुलाच्या आईलाच शिक्षिका व तिच्या पतीने धमकावले आहे. पूजा सिंह असे या शिक्षिकेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. पूजा आणि तिचा पती रोहित सिंह या घटनेनंतर पसार झाले आहेत.
कोलकाता येथे राहणा-या शालिनी अग्रवाल यांनी मुलाच्या शिकवणीसाठी पूजा सिंह या शिक्षिकेला ठेवले होते. पूजा आठवड्यातून तीन वेळा त्यांच्या घरी शिकवायला यायची. शिकवणीसाठी पूजाने स्वतंत्र खोलीही मागितली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अग्रवाल यांचा मुलगा पूजा घरी आल्यावर घाबरुन जायचा. पूजा शिकवणी घेत असताना खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शालिनी यांनी खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरु केले व व्हिडीओ फुटेजमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला.
शिकवणी घेत असताना पूजाने त्या चिमूरड्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्या मुलाला उचलून बेडवर फेकल्याचेही या फुटेजमध्ये दिसते. या मारहाणीसाठी शालिनी यांनी पूजा व तिच्या पतीला जाब विचारला. यावर दोघांनीही शालिनी यांनाच धमकावले. शालिनी यांचे पती परदेशवरुन परतले व त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पूजा व रोहितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.