साधू-महंतही टेक्नोसॅव्ही...
By Admin | Updated: January 5, 2015 04:19 IST2015-01-05T04:19:01+5:302015-01-05T04:19:01+5:30
बदलत्या काळात सोशल मीडियाने साऱ्यांनाच वेड लावले. आता तर हा छंद नव्हे, तर एक गरज बनली आहे.

साधू-महंतही टेक्नोसॅव्ही...
संदीप झिरवाळ, नाशिक
बदलत्या काळात सोशल मीडियाने साऱ्यांनाच वेड लावले. आता तर हा छंद नव्हे, तर एक गरज बनली आहे. माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी अथवा प्रचार-प्रसारासाठी हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. त्यामुळेच सर्वसंग परित्याग करणारे साधू-महंतही फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइकचा वापर करताना दिसत आहेत.
सोशल मीडिया चांगला की वाईट हा विषय वादाचा असला, तरी चांगल्या कामासाठी सोशल मीडिया किंवा प्रगत माध्यमांचा वापर अपरिहार्य ठरला आहे. देशभरातील अनेक मठाधिपतींनी आपल्या वेबसाइट आणि आॅनलाइन सेवा सुरू केल्या आहेत.
कुंभमेळ्यात येणारे साधू-महंत म्हटले की, अंगावर भगवे कपडे, जटा वाढलेल्या, हातात-गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावर भले मोठे गंध असे चित्र सहजच डोळ्यांसमोर उभे राहते. कोठेतरी निर्जन स्थळी आणि विशेषत: हिमालयातच तप-आराधना करणारे साधू-महंत असा एक समज आहे. मात्र नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले साधू-महंत आणि त्या आखाड्याशी संलग्न सर्वच महंत आणि प्रमुख खालशांच्या साधू-महंतांच्या हाती स्मार्ट फोन आल्याचे दिसत आहे.
जुलैपासून नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीत सहभागी असलेल्या महंतांकडे स्मार्ट फोन तर आहेच; शिवाय ते व्हॉट्सअॅप, हाइक, गुगल प्लस, लाइन, हॅँगआऊट, टेलिग्राफ अशा विविध अॅप्सचा वापर करीत आहेत. कोणतीही माहिती वा छायाचित्र हवे असल्यास तत्काळ या माध्यमातून ते उपलब्ध करून घेतात किंवा देतात.