केरळमध्ये सार्वजनिक बसमध्ये पॉर्न फिल्मचे प्रसारण
By Admin | Updated: June 18, 2015 18:05 IST2015-06-18T17:08:40+5:302015-06-18T18:05:44+5:30
सार्वजनिक बसमध्ये जाहिरातींच्या ठिकाणी पॉर्न फिल्म लागल्याने प्रवासी चक्रावले. ही फिल्म तब्बल अर्धा तास सुरू असून ती दिसू नये यासाठी प्रवाशांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.

केरळमध्ये सार्वजनिक बसमध्ये पॉर्न फिल्मचे प्रसारण
>ऑनलाइन लोकमत
थिरुअनंतपुरम, दि. १८ - सार्वजनिक बसमध्ये जाहिरातींच्या ठिकाणी पॉर्न फिल्म लागल्याने प्रवासी चक्रावले. ही फिल्म तब्बल अर्धा तास सुरू असून ती दिसू नये यासाठी प्रवाशांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.
वेनाड जिल्ह्यातील कालापेट्टा या ठिकाणी राज्य सरकारमार्फत चालवली जाणा-या सार्वजनिक बसमध्ये जाहिरातींसाठी लावण्यात आलेल्या टिव्हीवर केबल चालकाच्या चुकीने पॉर्न फिल्म लागली. या वेळी बस प्रवाशांनी पुर्णतः भरलेली होती. हा प्रकार लक्षात येताच काही प्रवाशांनी ती फिल्म दिसू नये म्हणून टिव्ही बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टिव्ही बंद करता आली नाही. तसेच प्रसारण कक्षात संपर्क साधला असता तो बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी या बसमध्ये महिला, शाळेत, कॉलेजला जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. एका प्रवाशाने ती दृश्ये दिसूनये म्हणून टिव्हीवर कपडा टाकला परंतू त्या फिल्मचा आवाज येत होता.
काहीवेळाने एका व्यक्तीला लोखंडी रॉड सापडला असता त्याने रॉडचा घाव टिव्हीवर घातला व केबलची वायर तोडून टाकल्यावर 'त्या' फिल्मचे प्रसारण बंद झाले. केबल ऑपरेटरने कंडोमची जाहिरात असल्याचे समजून ती फिल्म लावल्याचे कालापेट्टा येथील पोलीस निरीक्षक के.के. शरीफ यांनी सांगितले आहे. तसेच केबल चालक मझूर याला भारतीय दंड विधान संहिता कलम २९२ व माहिती तंत्रज्ञानाच्या इतर कलमांखाली अटक करण्यात आली व त्याला न्यायालयात सादर करण्यात आल्याचेही शरीफ यांनी सांगितले. या प्रकरणी केबल ऑपरेटरला विचारले असता त्याने आपली चुक मान्य केली.