शांततेसाठी मुस्लीमांना स्वायत्त प्रांत देण्याचा फिलिपाइन्सच्या अध्यक्षांचा प्रस्ताव
By Admin | Updated: September 10, 2014 18:27 IST2014-09-10T18:27:37+5:302014-09-10T18:27:37+5:30
कॅथॉलिक ख्रिश्चन बहुसंख्य असलेल्या फिलिपाइन्सच्या अध्यक्षांनी देशाच्या दक्षिण भागातल्या मुस्लीमांच्या काही दशकांच्या बंडाला आवर घालण्यासाठी स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

शांततेसाठी मुस्लीमांना स्वायत्त प्रांत देण्याचा फिलिपाइन्सच्या अध्यक्षांचा प्रस्ताव
ऑनलाइन टीम
मनिला, दि. १० - कॅथॉलिक ख्रिश्चन बहुसंख्य असलेल्या फिलिपाइन्सच्या अध्यक्षांनी देशाच्या दक्षिण भागातल्या मुस्लीमांच्या काही दशकांच्या बंडाला आवर घालण्यासाठी स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यानुसार मुस्लीमांना स्वत:चे सरकार चालवणे, शरीयासारख्या कायद्याची अमलबजावणी करणे आणि वेगळा ध्वज राखणे शक्य होणार आहे. मुस्लीमांच्या आंदोलनातून शांततापूर्ण मार्ग निघावा यासाठी फिलिपाइन्सचे अध्यक्ष बेनिग्नो अक्विनो (तिसरे) यांनी हा प्रस्ताव आज बुधवारी काँग्रेसमध्ये सादर केला. गेल्या चार दशकाच्या या आंदोलनात आत्तापर्यंत दीड लाख लोकांनी प्राण गमावले असून आता तरी फिलिपाइन्समध्ये शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मिन्दानाओ या प्रांताच्या दक्षिण भागात सदर स्वायत्त भाग घोषित करण्यात येईल व त्याला बांगसामोरो असे संबोधण्यात येईल. या प्रांताची ६० सदस्यांची स्वत:ची संसद असेल आणि कृषि, व्यापार, पर्यटन व शिक्षण या क्षेत्रांमध्येही ही संसद निर्णय घेण्यास स्वयंपूर्ण असेल. प्रस्तावानुसार या प्रांतातल्या मुस्लीमांना मुस्लीम शरीया कायदा लागू करण्यात येईल मात्र देशात बिगरमुस्लीमांसाठी सध्याचे कायदे लागू असतिल. या भागामध्ये पुढील पाच वर्षांमध्ये विकासासाठी ३८९ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचेही प्रस्तावित आहे.
संरक्षण, परकीय धोरण व पतधोरण आदी बाबींमध्ये केंद्राचा अधिकार अबाधित राहणार आहे. स्वायत्ततेसाठी १९७० पासून मुस्लीम लढा देत असून आत्तापर्यंत स्वायत्ततावादी व नागरिक मिळून दीड लाख जणांनी प्राण गमावले आहेत. बंडखोरांमध्ये कट्टरतेची व दहशतवादाची बीजे रोवली जाऊ नयेत यासाठी या प्रकारच्या स्वायत्ततेला अमेरिका व पाश्चात्य देशांनीही पाठिंबा दिला आहे. सदर प्रस्ताव करण्यासाठी गेली १३ वर्षे वाटाघाटी सुरू होत्या.
या प्रस्तावावर संसदेमध्ये चर्चा होणार असली तरी हा प्रस्ताव संमत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात मुस्लीमांच्या ताब्यात प्रदेशाची स्वायत्ता देण्यास विरोध असलेल्या ख्रिश्चन संस्थांकडून कायदेशीर अडचणी उभ्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच काही मुस्लीम बंडखोर गट हा प्रस्ताव स्वीकारून सशस्र क्रांतीचा त्याग करणार नाहीत अशीही भीती व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबाबतीत चित्र स्पष्ट होईल आणि फिलिपाइन्समधील ख्रिश्चन विरुदध मुस्लीम हा संघर्ष संपतो का यवर प्रकाश पडेल.