बलात्काराच्या मानसिकतेमागे पॉर्न फिल्मच
By Admin | Updated: July 25, 2014 18:11 IST2014-07-25T18:04:54+5:302014-07-25T18:11:19+5:30
पॉर्न बघणा-या ७६ टक्के विद्यार्थ्यांमध्ये बलात्कार करायची विकृत मानसिकता वाढते अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे

बलात्काराच्या मानसिकतेमागे पॉर्न फिल्मच
ऑनलाइन टीम
पणजी, दि. २५ - पॉर्न बघणा-या ७६ टक्के विद्यार्थ्यांमध्ये बलात्कार करायची विकृत मानसिकता वाढते अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. रेस्क्यू या संस्थेने गोव्यातील तरुणांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली असून या सर्वेक्षणामुळे पॉर्न साईट्सवरील बंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रेस्क्यू या संस्थेने गोव्यातील १० महाविद्यालयांमधील २०० विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले होते. १८ ते २२ या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी पॉर्न बघत असल्याचे मान्य केले. यातील ४० टक्के विद्यार्थी नियमीतपणे बलात्काराचे पॉर्न व्हिडीओस बघतात. तर ४७ टक्के विद्यार्थी हे लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ बघतात. अनेक विद्यार्थ्यांनी पॉर्नचे हिंसक व्हिडीओ बघायला आवडतात असेही सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे पॉर्न बघणा-यांपैकी ७६ टक्के विद्यार्थ्यांनी पॉर्न बघितल्यावर बलात्कार करायचे इच्छा वाढते असे कबूल केले. एक विद्यार्थी आठवड्याला सरासरी २९ पॉर्न व्हिडीओ बघतो अशी माहिती सर्वेक्षणातून समोर येते.
रेस्क्यू या संस्थेने या गंभीर विषयावर सरकारी पातळीवर लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलेल्या लॅपटॉपमध्ये असे सॉफ्टवेअर टाकावे की ज्यातून पॉर्न साईट्स उघडणारच नाहीत अशी मागणी संस्थेने केली आहे. संस्थेचे सीईओ अभिषेक क्लिफर्ड म्हणाले, इंटरनेटवरील पॉर्न साइट्समुळे बलात्काराच्या घटना वाढत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर येते. रेप व हिंसक पॉर्नमुळे बलात्कार करण्याची मानसिकता प्रबळ होते. पॉर्न बघणे हे व्यसन असून अश्लील चित्रपट बघितल्यावर समाधान न मिळाल्याने हे विद्यार्थी रेप किंवा हिंसक पॉर्नकडे वळतात. त्यामुळे यावर लगाम लावण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.