कर्नाटक बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. याच दरम्यान कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील एक अनोख उदाहरण समोर आलं आहे, जे केवळ पालकांच्या विचारसरणीत बदल घडवू शकत नाही तर अपयशाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा देखील देऊ शकतं. परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर, विद्यार्थ्याला कुटुंब, नातेवाईक, समाज आणि शाळेतील लोकांकडून टोमणे ऐकावे लागतात. ज्यामुळे विद्यार्थी अनेकदा निराश होतात आणि डिप्रेशनमध्ये जातात असं अनेकदा दिसून येतं.
समाजात असं वातावरण निर्माण झालं आहे की, दहावी किंवा बारावीचे निकाल त्यांच्या भविष्याचा पाया ठरवू शकतात, जे बरोबर आणि चूक दोन्हीही असू शकतं. या परिस्थितीत, पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की कमी गुण मिळालेल्या किंवा नापास झालेल्या मुलांशी त्यांनी सामान्यपणे वागलं पाहिजे आणि त्यांच्यावर दबाव आणू नये. कर्नाटकातून असाच एक कौतुकास्पद प्रकार समोर आला आहे, ज्यातून देशभरातील कुटुंबांनी धडा घेतला पाहिजे.
नुकत्याच जाहीर झालेल्या कर्नाटक बोर्डाच्या दहावीच्या निकालात (कर्नाटक बोर्ड परीक्षा २०२५), बागलकोटमधील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलचागुड्डा या विद्यार्थ्याला ६०० पैकी फक्त २०० गुण मिळाले आहेत. दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे, त्याचे मित्र आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्याची खूप खिल्ली उडवली. मात्र मुलगा नापास झाला असला तरी त्याचे पालक त्याच्या पाठीशी उभे राहिले. असा निकाल आल्यानंतर मुलांना ओरडलं जातं, परंतु अभिषेकच्या पालकांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी आपल्या मुलाचे मनोबल वाढवण्यासाठी केक कापला आणि कुटुंबाने एकत्र आनंद साजरा केला आणि त्याला प्रोत्साहन दिलं.
अभिषेकच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही परीक्षेत नापास होऊ शकता, पण आयुष्यात नाही. हा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. या सकारात्मक वृत्तीचा अभिषेकवर खोलवर प्रभाव पडला. अभिषेक भावुक झाला आणि म्हणाला, यावेळी मी अपयशी ठरलो तरी माझ्या कुटुंबाने माझी साथ सोडली नाही. मी पुन्हा परीक्षा देईन आणि आयुष्यात पुढे जाईन. अभिषेकची ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि बरेच लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अभिषेकच्या पालकांचं भरभरून कौतुक करत आहेत.