नरेंद्र मोदी सामाजिक कार्यकर्ते तर राहुल गांधी रणनिती सल्लागार
By Admin | Updated: July 30, 2014 11:04 IST2014-07-30T09:52:24+5:302014-07-30T11:04:20+5:30
राजकारणातील मातब्बरांना धूळ चारुन पंतप्रधानपदी विराजमान होणारे नरेंद्र मोदी हे व्यवसायाने सामाजिक कार्यकर्ते तर राहुल गांधी हे धोरणविषयक सल्लागार आहेत.

नरेंद्र मोदी सामाजिक कार्यकर्ते तर राहुल गांधी रणनिती सल्लागार
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - निवडणुकीत मातब्बरांना धूळ चारुन भाजपला सत्ता मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यवसायाने सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर निवडणुकीत राहुल गांधी यांची रणनिती सपशेल अपयशी ठरली असली तरी ते धोरणविषयक सल्लागार असल्याचे समोर आले आहे.
सोळावी लोकसभा अस्तित्वात येऊन काही महिनेच लोटले असून निवडणुकी दरम्यान या खासदारांनी त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली होती. यावरुन १६ व्या लोकसभेतील तब्बल १४३ खासदार हे शेतकरी असून ८७ खासदार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोकसभा सचिवालयाने खासदारांच्या व्यवसायाविषयी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेतील ७२ खासदार हे व्यावसायिक आहेत तर ५४ खासदार हे वकील आहे. ३६ खासदार राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते असून २६ खासदार हे डॉक्टर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवरणपत्रात व्यवसायाविषयीच्या रकान्यात सामाजिक कार्यकर्ता असे लिहीले आहे. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वतःला सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता म्हटले आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि सुषमा स्वराज यांनी वकिली व्यवसाय असल्याचा उल्लेख केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्वतःला पत्रकार म्हटले आहे.