जगभरात असे अनेक बेटं आहेत, जे आजही लोकांसाठी रहस्यमय आहेत. असंच एक बेट स्कॉटलॅंडमध्ये आहे. हे बेट आयनहॅलो नावाने ओळखलं जातं. हृदयाच्या आकाराचं हे बेट फार सुंदर आहे. पण हैराण करणारी बाब ही आहे की, इथे वर्षातून केवळ एकदाच लोकांना जाण्याची परवानगी मिळते. बाकीचे ३६४ दिवस या बेटावर जाणं अशक्य आहे.
हे बेट इतकं लहान आहे की, याला नकाशावर शोधणंही कठीण आहे. तसेच या बेटाबाबत अनेक रहस्यमय कथाही प्रचलित आहेत. पौराणिक कथांनुसार या बेटावर भूत-आत्मा राहतात.
कथा-मान्यतांनुसार, या बेटावर जर एखादी व्यक्ती जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला वाईट आत्मा आपल्या जाळ्यात घेतात. असेही म्हटले जाते की, या बेटावर जलपरी सुद्धा राहतात. ज्या गरमीच्या दिवसात बाहेर निघतात.
स्कॉटलॅंड हायलॅड्स विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डेन ली यांच्यानुसार, या बेटावर हजारो वर्षांआधी लोक राहत होते. पण १८५१ मध्ये इथे प्लेग आजार पसरला. त्यामुळे लोक बेट सोडून दुसरीकडे गेले. तेव्हापासून या बेटावर कुणीच गेलं नाही. इथे अनेक जुन्या इमारतींचे भग्नावशेष पडून आहेत. पुरातत्ववाद्यांनुसार, खोदकाम केल्यावर इथे पाषाण काळातील अनेक भिंती सापडल्या.
हे बेट कधी तयार झालं याबाबत काही माहिती उपलब्ध नाही. पुरातत्ववाद्यांचं मत आहे की, इथे आणखी शोधकाम केलं पाहिजे. जर इथे शोधकाम केलं गेलं तर इतिहासातील अनेक रहस्य समोर येतील, जे लोकांना हैराण करतील.
आयनहॅलो बेट हे ओर्कने बेटापासून केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. ओर्कने बेटावर लोक राहतात. पण तरी सुद्धा आयनहॅलो बेटावर जाणं सहज शक्य नाहीये. इथे बोटीच्या मदतीनेही जाता येत नाही. कारण येथील लाटा इतक्या उंच उसळतात की, तिथे पोहोचणं शक्य होत नाही.