विज्ञानाने आज भलेही कितीही प्रगती केली असली तर पृथ्वी अजूनही अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचं रहस्य उलगडण्यात वैज्ञानिक यशस्वी ठरले नाहीत. दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनिझुएलामध्ये एक ठिकाण आहे. जिथे एका तलावावर सतत वीजा कडाडत राहतात. पण याचं रहस्य आजही रहस्यच आहे.
तुम्ही हे तर ऐकलं असेलच की, आकाशात वीज एकाच जागेवर दोनदा कडाडत नाही. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इथे एकाच ठिकाणी एक तासात हजारो वेळा वीज चमकते.
जगाला हैराण करणाऱ्या या रहस्याला 'बीकन ऑफ मॅराकाइबो' असं म्हटलं जातं. याला आणखीही काही वेगळी नावे आहेत. जसे की, कॅटाटुम्बो लायटनिंग, एव्हरलास्टिंग स्टॉर्म, ड्रॅमॅटिक रोल ऑफ थंडर. या ठिकाणाला वीजेचं घरही म्हटलं जातं.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, व्हेनिझुएलामध्ये कॅटाटुम्बो नदी ज्या ठिकाणी मॅराकायबो सरोवराला मिळते, तिथे वर्षातून २६० दिवस वादळी असतात. या २६० दिवसांमध्ये येथील वादळी रात्रींमध्ये सतत वीजा कडाडत राहतात.
मॅराकायबो तलावाचं नाव सर्वात जास्त वीजा चमकणारं ठिकाण म्हणून गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे. थंडीच्या दिवसात कमी, पण पावसाळ्यात इथे फार जास्त वीजा कडाडतात. एका रिपोर्टनुसार, पावसाळ्यात इथे दर मिनिटाला २८ वेळा वीजा कडाडतात.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, येथील आकाशात कडाडणाऱ्या वीजांचा प्रकाश इतका जास्त असतो की, तो तुम्हाला ४०० किलोमीटरच्या अंतराहूनही बघायला मिळतो. लोकांचं म्हणनं आहे की, हे बघायला असं वाटतं की, जणू आकाश वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालय.
या ठिकाणी इतक्या वीजा का कडाडतात? हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक वर्ष अभ्यास केला. १९६० मध्ये असं मानलं गेलं होतं की, या परिसरात यूरेनियमचं प्रमाण अधिक असल्याने इथे जास्त प्रमाणात वीजा कडाडतात.
वैज्ञानिकांनी नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगितलं आहे की, सरोवराच्या जवळील तेल असलेल्या क्षेत्रात मीथेनचं प्रमाण अधिक असल्याने आकाशात वीजा अधिक चमकतात. मात्र, यूरेनियम आणि मीथेन संदर्भातील सिद्धांत सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे येथील रहस्य अजूनही कायम आहे.