शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरून टाकणारं, जिवाला तृप्ती देणारं खाणं म्हणजे मिसळ नंबर १

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 09:31 IST

चवीनं खाणाऱ्यांची पाहणी करून जगभरातील पारंपरिक शाकाहारी पदार्थांची (व्हेगन) यादी करण्याचा प्रयोग गेल्या आठवड्यात पार पडला. त्यात भारतीय पदार्थांत नंबर वन ठरली, मराठमोळी मिसळ. अशा ५० जागतिक पदार्थांच्या यादीत तिचा ११ वा नंबर लागला आहे. त्यानिमित्त मिसळीवर तर्रीबाज नजर...

मिलिंद बेल्हे

समोरच्या प्लेटमध्ये मटकी, मुगाची उसळ, त्यावर बटाटा, पोहे किंवा चिवड्याची मस्त पखरण, मिसळीशी सहज सलगी करेल असे फरसाण, त्यावर कांदा. शेजारी लिंबाची फोड आणि बाजूला झकास तर्री किंवा कट. शेजारी गुबगुबीत पावाची जोडी. असा जामानिमा पाहिला की कोणत्या खवय्याच्या तोंडाला पाणी सुटणार नाही...?

अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची नावे घेतली की, ती मिसळीशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. स्टँडजवळचं किंवा एखाद्या गल्लीत आडवाटेनं बसलेलं एखादं हॉटेल असावं. तिथं ऑर्डर दिल्यावर अख्ख्या गर्दीला ऐकू जाईल, अशा आवाजात मालकांनी एक मिस्सळ अशी आरोळी ठोकावी आणि समोर तांबडाजर्द तवंग मिरवणारी मिसळ ऐटीत येऊन बसावी. छोट्या प्लेटमध्ये असलेला मिसळीचा सारा संसार खालच्या मोठ्या प्लेटमध्ये ओतून घ्यावा. सगळा माल-मसाला मनाजोगता ढवळून घ्यावा. त्यावर तर्री ओतावी. लिंबू पिळावं. एकजीव करावं आणि पावाचा एक तुकडा मोडून मिसळीत बुडवून तसाच तोंडात कोंबावा. क्षणभर डोळे बंद करून घ्यावे आणि त्या घासाबरोबर मिसळीची चव जिभेवरून घोळवून घ्यावी. मिसळ जर झणझणीत असेल तर तर पहिल्याच घासाला लागणारा ठसका त्याची पोचपावती देऊन जातो. नंतर तोंड खवळून उठते. जिभेला धार येते. घाम फुटतो आणि एकामागोमाग पाव संपत राहतात. झकास ढेकर पोट भरल्याची पावती देतो. वर फक्कड चहा मारायचा. (हल्ली शहरी परंपरेत या सोबतीला ताक, खरवस, सरबत असे पदार्थ देऊन मिसळीची चव पार घालवून टाकतात.) अशी मिसळ ज्याने चाखलीय, तो तिला भारतात नंबर वन ठरवणारच. हे पोट भरून टाकणारं, जिवाला तृप्ती देणारं खाणं...

मिसळ खावी, तर ती मराठमोळ्या हॉटेलातच. भजीच्या तळलेल्या घाण्यातून उरलेले चिमणी-कावळे, कधी साध्या पोह्याऐवजी भाजक्या पोह्यांचा चिवडा, तिथेच रस्त्यावर उघडाबंब बसून कोणी एकाने घाणे भरून काढलेली शेव- गाठी... चमच्यानं न देता मुठीनं टाकलेला (की मारलेला?) कांदा आणि सर्वात बहार आणणारी त्या त्या हॉटेलची परंपरा जपणारी तर्री किंवा कट. त्याला तोटा नाही; पण तर्री मागितल्यावर छोट्याशा वाटीत जेव्हा लालरंगी मसालेदार पाणी आणून ठेवतात आणि त्याला, कांद्याला एक्स्ट्रा चार्ज लागेल, असे सांगतात, ते मिसळीचे खानदानी हॉटेलच नव्हे. 

त्यातही मटकीऐवजी कडधान्यातला हिरवा वाटाणा किंवा रगडा घालून जो मिसळ नावाचा पदार्थ दाक्षिणात्य किंवा उत्तर भारतीय हॉटेलांत मिळतो, ती मिसळ नव्हे. त्याला फारतर उसळ म्हणता येईल. त्यातही तिखट लागते म्हणून मिसळीच्या या शहरी अवतारावर दही घालून फरसाणाचा पार चिखल करून टाकतात. त्यातही काही ठिकाणचे फरसाण इतके कडक असते की मिसळीसोबत तेही शिजवले असते तरी चालले असते, अशी त्याची तऱ्हा. तिथली मिसळ जर त्या परदेशस्थांनी चाखली असती, तर मिसळीचा नंबर हमखास घसरला असता. 

सो स्पाइसी हवी ना? मुंबईत चांगली मिसळ शोधावीच लागते. येऊन-जाऊन तिच नावे समोर येतात आणि बोटाला तर्री लागेल म्हणून टिश्यू पेपर ठेवणाऱ्या... सो स्पाइसी म्हणत तिच्या तिखटपणाला नाके मुरडणाऱ्या,  पावाऐवजी ब्रेड खाणाऱ्या, काट्या-चमच्याने तिची चव चाखायला देणाऱ्या हॉटेलांत मिसळ खाणे अगदीच जिवावर येते. त्यातही उपवासाची मिसळ हा आणखी उपवासाचे पदार्थ एकत्र करून समोर येणारा आणि उपवास का केला, असा प्रश्न विचारायला लावणारा प्रकार. शिवाय त्याच्यासोबत जर पियुष असेल तर...? उपवास करणाऱ्यांनीच ती रिस्क घ्यावी. 

आणखी कोणते पदार्थ यादीत? भारतीय पदार्थांच्या यादीत मिसळीनंतर नंबर लागतो, तो आलू गोबी, राजमा, गोबी मंचुरियन, मसाला वडा, भेळ, राजमा-चावल, भेळपुरी यांचा; पण जशी मिसळीला एका विशिष्ट प्रांताची ओळख आहे, तशी या पदार्थांना नाही. काही पदार्थ तर इकडून-तिकडून येऊन त्या त्या प्रांतात हळूहळू विकसित झाले आहेत.

मिसळीत पूर्वी कोल्हापूरची, पुण्याची, खान्देशी, नगरी अशी वेगवेगळ्या चवीची ठिकाणे होती. एसटी स्टॅंडजवळची, गल्लीबोळातली ठिकाणे यात धरलेली नाहीत. त्यात आता वरचढ ठरतेय नाशिकची मिसळ. मिसळीचा सगळा जामानिमा मांडून सोबत तर्रीची मोठ्ठी वाटी किंवा लहानखुरी बादली... सोबतीला भरपूर कांदा-लिंबू... वा, क्या बात है! त्यातही कुणाला आणखी उसळ लागेल, कुणाला कांदा लागेल म्हणून अख्खी थाळी सोबत ठेवलेली. हल्ली मोठ्या शहरांत मिसळ महोत्सव होतात. त्यात त्या महोत्सवाचा सारा खर्च एकाच प्लेटच्या खर्चातून भरून काढायचा असल्यासारख्या त्याच्या किमती असतात. शिवाय वेळ सरत गेली की, तर्री पातळ होत जाते. त्यात तिखटाचा मारा केला जातो. तो प्रकार म्हणजे मिसळ नको; पण हात आवर म्हणणाऱ्यातला.