मेहुणीनं भर मांडवात किस केलं आणि लग्न मोडलं
By Admin | Updated: December 6, 2014 08:57 IST2014-12-06T08:57:14+5:302014-12-06T08:57:14+5:30
ऐन लग्नाच्या दिवशी उत्साहाच्या भरात मेहुणीने नववर असलेल्या दीराला किस केलं आणि त्याच्यासोबत तिथंच नाच केला म्हणून ते लग्नंच मोडण्याची घटना इथे घडली आहे.

मेहुणीनं भर मांडवात किस केलं आणि लग्न मोडलं
ऑनलाइन लोकमत
अलीगड (उत्तर प्रदेश), दि. ६ - ऐन लग्नाच्या दिवशी उत्साहाच्या भरात मेहुणीने नववर असलेल्या दीराला किस केलं आणि त्याच्यासोबत तिथंच नाच केला म्हणून ते लग्नंच मोडण्याची घटना इथे घडली आहे. उच्चशिक्षित घरात शहरातल्या प्रतिष्ठित व्यक्तिंसह महापौरांनीही हजेरी लावलेल्या लग्नसमारंभात हा प्रकार घडला आहे.
बॉलीवूडमधल्या एखाद्या चित्रपटात शोभाव असाच हा प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख झाल्यानंतर भेटीगाठी झाल्या, दोघांच्या घरच्यांनी पसंती दिली आणि लग्नाचा बार उडवण्यात आला. आता लग्न लागणार अशी वेळ आली असताना अत्यंत खुशीत आलेल्या वधुच्या बहिणीने नववराला किस केलं आणि त्याच्यासोबत नृत्याच्या चार स्टेप्सही केल्या. घरच्यांसह सगळे पाहुणे हे दृष्य बघून अवाक झाले आणि त्यांच्या नापसंतीची मोहरदेखील चेह-यावर उमटली. परंतु, उत्साहाच्या अतिरेकात मेहुणीच्या काही ध्यानात आलं नाही आणि अखेर रणकंदन माजलेल्या अवस्थेत हे लग्नंच मोडलं. हा प्रकार घडल्यावर दोन तट पडले आणि काही कळायच्या आत एकमेकांवर शिव्याशापांचा हल्ला करत लग्नमंडपाला युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त झालं. मुलीच्या घरच्यांनी केवळ नववराला ताब्यात घेतलं नाही, तर त्याच्या नातेवाईकांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अलीगडच्या महापौर शकुंतला भारती यांनी वाद सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. हा सगळा त्यांचा वैयक्तिक मामला होता, परंतु वाद सोडवण्याचा आपण प्रयत्न केल्याचे भारती यांनी सांगितले. नंतर थंड झालेल्या दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांविरोधात पोलीस केस करण्याचे मात्र टाळले आणि प्रकरणावर पडदा टाकला. अर्थात, मेहुणीचा एक किस असा भारी पडला आणि तूर्तास तरी ते लग्न मात्र मोडले.