प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. अशीच एक प्यारवाली लव्हस्टोरी आता समोर आली आहे. डेंग योकाई याचं सहा वर्षांपूर्वी येयशी लग्न झालं होतं. येयला ग्लिओमा नावाचा ब्रेन ट्यूमर होता. हा आजार वारंवार होऊ शकतो. पण या दरम्यान "मी जगात शक्य असेल तितक्या सर्व प्रकारे तुझ्यावर उपचार करेन" असं डेंग योकाईने आपल्या पत्नीला सांगितलं. लग्नानंतर तीन वर्षांनी मुलगी हन्हानचा जन्म झाला. येयची प्रकृती पुन्हा बिघडली. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, कोमात जाण्यापूर्वी, येयने डेंगला उपचार खूप महाग आहेत, त्यामुळे मला मरू दे असं सांगितलं होतं.
येयवर अनेक सर्जरी केल्या पण तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. डॉक्टरांनी हार मानली,ती वाचणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं. पण डेंग योकाईने हार मानली नाही. तो प्रयत्न करत राहिला. त्याने त्याची मुलगी हन्हानचा एक व्हिडीओ बनवला, ज्यामध्ये ती येयच्या गालावर प्रेमाने किस करत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, जो लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्शून गेला. लोकांनी पैसे द्यायला सुरुवात केली जेणेकरून डेंग त्याच्या पत्नीवर पुन्हा उपचार सुरू करू शकेल.
व्हिडिओनंतर तीन महिन्यांनी, डेंग येयला पुन्हा रुग्णालयात घेऊन गेला आणि यावेळी एक चमत्कार घडला, येय कोमातून बाहेर आली. दोन महिन्यांनी ती बोलू लागली. डेंग योकाईने यानंतर डॉक्टरांचे आभार मानले आणि येयला घरी घेऊन आला. त्याने नोकरी सोडली आणि आपला संपूर्ण वेळ तिला दिला. तो येयला दररोज चालण्यासाठी मदत करायचा आणि तिच्यासाठी गाणी गायचा.
ती आम्हाला सोडून जावी असं मला वाटत नाही असं डेंगने म्हटलं होतं. आता येय स्वतः हळूहळू चालू शकते आणि रस्त्याच्या कडेला एक स्टॉल देखील चालवते. डेंग आणि ये २०१६ मध्ये एका मित्राच्या लग्नात भेटले होते. आता कपल सोशल मीडियावर लोकप्रिय झालं असून तिथेही कमाई करत आहे, तिथे त्यांचे तब्बल २० लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.