अंत्ययात्रा पोहोचली ठाण्यात
By Admin | Updated: July 14, 2014 08:50 IST2014-07-13T01:00:33+5:302014-07-14T08:50:32+5:30
भुट्टे विक्रेत्याच्या मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी करीत शोकसंतप्त जमाव भुट्टे विक्रेत्याच्या मृतदेहासह गिट्टीखदान ठाण्यात धडकला. यामुळे गिट्टीखदान ठाण्याच्या परिसरात

अंत्ययात्रा पोहोचली ठाण्यात
भुट्टा विक्रेत्याचे हत्या प्रकरण : गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तणाव
नागपूर : भुट्टे विक्रेत्याच्या मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी करीत शोकसंतप्त जमाव भुट्टे विक्रेत्याच्या मृतदेहासह गिट्टीखदान ठाण्यात धडकला. यामुळे गिट्टीखदान ठाण्याच्या परिसरात आज दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना आपल्या हवाली करावे आणि मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करीत जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारात पाऊणतासावर घोषणाबाजी केली. पोलिसांनी संयमाने स्थिती हाताळून शोकसंतप्त जमावाची समजूत काढण्यात यश मिळवले. त्यामुळे अनुचित प्रकार टळला.
महिंद्र माताचरण शाहू (वय ४५) या भुट्टे विक्रेत्याची क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी सायंकाळी आरोपी गुड्डू ऊर्फ विजेंद्रसिंग चंदेल आणि संदीप समुद्रे (रा. दोघेही झिंगाबाई टाकळी) या गुंडांनी निर्घृण हत्या केली होती. गोधनी मार्गावरील पांडुरंग मंगल कार्यालयाजवळ झालेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात शुक्रवारी रात्रीपासून संतप्त वातावरण आहे. आज दुपारी १ च्या सुमारास शाहूच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह घेऊन गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. शाहूची हत्या करणाऱ्या आरोपींना आमच्या हवाली करा, अशी संतप्त जमावाची मागणी होती. त्यासाठी जमावातील काही जण चिथावणीची भाषा वापरत होते. मृत शाहूला पत्नी आणि दोन मुले आहेत. घरातील कर्ता जीव गेल्याने शाहू कुटुंबीय अक्षरश: उघड्यावर आले आहे. त्यामुळे दोन्ही मुलांना पाच-पाच लाखांची आर्थिक मदत मिळावी, अशीही जमावाची मागणी होती. परिस्थिती चिघळू शकते, हे ध्यानात घेत पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. आर्थिक मदत देणे पोलिसांच्या अधिकारात नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांकडे अर्ज करावा लागेल, असे समजवून सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही बोंडे यांनी सांगितले. मृतदेहाची आणखी जास्त वेळ अवहेलना करू नका, तातडीने अंत्यसंस्कार करा, असे भावनिक आवाहन बोंडे यांनी केले. त्यामुळे शोकसंतप्त जमावाने पोलीस ठाण्याचा आवार सोडला. यानंतर शाहूवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)