Red Line on Medicine: डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, कंबर दुखत असेल की ताप आला असेल, लोकांच्या घरीच या समस्या दूर करण्याठी टॅबलेट्स असतात. वेगवेगळ्या टॅबलेट्सचे पॅकेटच लोक घरी ठेवतात. बाहेर जाताना बॅगमध्येही काही टॅबलेट्स ठेवतात. तुम्हीही जवळ औषधांच्या गोळ्यांच्या स्ट्रीप ठेवत असाल. पण अशाप्रकारे डॉक्टरांच्या सल्लाशिवाय या टॅबलेट्स घेणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. असो, तुम्ही टॅबलेट्स घेताना गोळ्यांच्या पाकिटावर मागच्या बाजूनं एक लाल रंगाची उभी रेष पाहिली असेलच. सामान्यपणे लाल रंग हा धोक्याचा संकेत असतो. पण इथे या लाल लाईनचा अर्थ काय होतो? ही रेष कशामुळे असते? हे तुम्हालाही माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गेल्यावर्षी Ministry of Health and Family Welfare याबाबत एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, काही औषधांच्या स्ट्रिपवर लाल रंगाची लाईन असेल तर याचा अर्थ असा होतो की, हे औषध कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. सोबतच जर तुम्हाला डॉक्टरांनी कोणतं औषध घ्यायला सांगितलं असेल तर त्याचा कोर्स पूर्ण करावा. औषधं न घेता फेकू नका.
काय आहे या रेषेचा अर्थ?
गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.
लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.
NRx चा अर्थ?
औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं लायसन्स असतं.
काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.