‘केबीसी’ गुंतवणूकदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: July 21, 2014 02:56 IST2014-07-21T02:56:32+5:302014-07-21T02:56:32+5:30
केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या सिडकोतील एका गुंतवणूकदाराने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे

‘केबीसी’ गुंतवणूकदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक : केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या सिडकोतील एका गुंतवणूकदाराने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ कंपनीकडून फसवणूक झालेली रक्कम ११० कोटी पाच लाख ९१ हजार ३०० रुपयांवर पोहोचली आहे़ रविवारपर्यंत ३५७ गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या.
‘केबीसी’विरोधात आतापर्यंत ३,१४९ गुंतवणूकदारांनी तक्रार केली आहे. सिडकोतील यशवंत व्यंकट बडगुजर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला़ त्यांनी चार पतसंस्थांतून कर्ज घेऊन सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फसवणूक प्रकरणात आडगाव पोलिसांनी अटक केलेले बापूसाहेब चव्हाण, साधना चव्हाण, नानासाहेब चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय जगताप, एजंट व व्यवस्थापक पंकज शिंदे, वाहनचालक नितीन शिंदे या सर्वांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने न्यायालयात हजर केले जाणार आहे़
केबीसीचे प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण यांचा मेहुणा व पोलीस कर्मचारी संजय जगतापचे बँक लॉकर सोमवारी उघडण्यात येईल. लॉकरमध्ये मोठी रक्कम व सोन्याचे दागिने असण्याचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)००