ISIS च्या दहशतवाद्यांना हैदरबादमधील तरुणीशी करायचं होतं लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 11:05 IST2016-07-27T08:23:58+5:302016-07-27T11:05:47+5:30
हैदराबादमधील तरुणीशी सिरियामधील इसीसच्या दहशतवाद्यांना लग्न करायचं होतं अशी माहिती एनआयएने इसीसच्या दहशतवाद्यांविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे

ISIS च्या दहशतवाद्यांना हैदरबादमधील तरुणीशी करायचं होतं लग्न
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 27 - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या इसीसच्या दहशतवाद्यांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याची बहिणदेखील हैदराबादच्या गटात सामील होती. तसंच सिरियामधील इसीसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कातही होती अशी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. इतकंच नाही तर या तरुणीशी सिरियामधील इसीसच्या दहशतवाद्यांना लग्नही करायचं होतं.
इसीसच्या हैदराबादमधील गटात 9 दहशतवाद्यांचा समावेश होता. ज्यामध्ये या तरुणीचा भाऊदेखील होता, ज्याला एनआयएने डिसेंबर 2015 मध्ये अटक केली आहे. भावासोबत तरुणीदेखील दहशतवाद्यांच्या या गटात सहभागी झाली होती. एनआयएने तरुणीविरोधात कोणतीही कारवाई केली नसून समुपदेशन करुन सोडून देण्यात आलं आहे. तरुणीची ओळख लपवण्यात आली आहे, मात्र ती हैदराबादमधील गटात सामील होती असा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात आहे.
सिरियामधील इसीस ऑपरेटिव्ह अबु झाकरिया सतत या तरुणीच्या संपर्कात होता. इसीसच्या दहशतवाद्यांसाठी त्याने 'जेहादी मॅट्रिमोनी' वेबसाईटही तयार केली होती. जेणेकरुन अबु बक्र अल-बगदादीने व्याप्त केलेल्या ठिकाणी प्रवास करण्यात कोणते अडथळे येऊ नयेत. सिरियामधीलत अबु हमजा अल मुजाहिरदेखील या तरुणीच्या आणि तिच्या भावाच्या संपर्कात होता. मुजाहिरला या तरुणीशी लग्न करायचं होतं अशी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.
तरुणीच्या भाऊ इसीस ऑपरेटिव्ह अबु झाकरियाच्या संपर्कात होता. इसीसीच्या विचारसरणीचा प्रसार करणे आणि गट चर्चा करण्याची जबाबदारी अबु झाकरियावर होती. अबु झाकरियादेखील तरुणीच्या संपर्कात होता आणि त्यालाही तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती.
एनआयएने सोमवारी इसीसच्या 3 दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. जम्मू काश्मीरचा निवासी असलेला शेखर अजहर उल इस्लाम, कर्नाटकच्या भटकळचा रहिवासी अदनान हसन आणि मुंब्रामधील मोहम्मद फरहान शेख यांचा यामध्ये समावेश आहे.