Interesting Facts : भारत देश जगभरात आपल्या संस्कृतीसाठी, अनोख्या इतिहासासाठी आणि सुंदर ठिकाणांसाठी ओळखला जातो. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची चर्चा नेहमीच होते. कधी यात प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांचा समावेश असतो तर कधी नैसर्गिक सौंदर्यासाठी. भारत आता जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देशही बनला आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, भारतात एक असंही गाव आहे जिथे केवळ एकच परिवार राहतो. सामान्यपणे गाव म्हटलं तर त्यात 100 ते 150 परिवार सहजपणे राहतात. पण या गावात केवळ एकच परिवार राहतो. चला तर जाणून घेऊ या अनोख्या गावाबाबत.
केवळ एकच परिवार राहत असलेल्या या गावाचं नाव बर्धनारा नंबर-2 असं आहे. याच नावाचं आणखी एक गाव आहे ज्याचं नाव बर्धनारा नंबर-1 आहे. हे गाव आसामच्या नालबारी जिल्ह्यात येतं. काही वर्षाआधी आसामच्या एका मुख्यमंत्र्याने गावात एका रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. पण तो रस्ता आता राहिला नाही. हा एकच रस्ता गावाला मुख्य शहरासोबत जोडत होता.
काही दशकांआधी या गावात बरेच लोक राहत होते. 2011 च्या जनगणनेमुसार, नंबर 2 बर्धनारा गावात 16 परिवार राहत होते. पण आता ती संख्या आणखी कमी झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या गावात केवळ एकच परिवार राहतो. ज्यात 5 सदस्य आहेत. लोक हे गाव सोडून इथून निघून गेले. कारण या गावात रस्ते नव्हते. पावसाळ्यात लोकांना खूप समस्या होत होत्या. आजही या गावात राहणाऱ्या परिवाराला पावसाळ्यात नावेच्या मदतीने प्रवास करावा लागतो.
इथे राहणाऱ्या परिवाराच्या कुटुंब प्रमुखाचं नाव बिमल डेका आहे. तो पत्नी अनीमा, तीन मुले नरेन दिपाली आणि सियुतीसोबत गावात राहतो. रिपोर्ट्सनुसार, बिमल डेकाच्या मुलांनी सांगितलं की, त्यांना शाळेत जाण्यात चिखलातून 2 किमी पायी चालत जावं लागतं. पावसाळ्यात नावेने जावं लागतं.
इतक्या वाईट स्थितीत राहूनही बिमल यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलं आहे. दिपाली आणि नरेन यांनी पदवी मिळवली आहे तर सियुती 12वी मध्ये आहे. त्यांचं मत आहे की, प्रशासन गावाकडे लक्षच देत नाहीत. त्यामुळे गावाची स्थिती बिघडली आहे.