एलियन होण्यासाठी केल्या शंभर शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:14 AM2022-01-18T05:14:23+5:302022-01-18T05:14:43+5:30

अमेरिकेतील २६ वर्षांची विनी ओह ही एक तरुणी. ती भिन्नलिंगी असल्याचंही म्हटलं जातं. तिला आपला चेहरा आमूलाग्र बदलायचा होता, इतरांपेक्षा वेगळा बनवायचा होता. त्यात तिला परग्रहावरील एलियन्सचं प्रचंड आकर्षण होतं.

Hundreds of surgeries performed to become aliens | एलियन होण्यासाठी केल्या शंभर शस्त्रक्रिया

एलियन होण्यासाठी केल्या शंभर शस्त्रक्रिया

Next

सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी जगात लोक काय काय करत नाहीत? जो कोणी जे काही सांगेल, ते इमानेइतबारे करण्यापासून, ‘हर्बल’ ट्रिटमेंटच्या नावाखाली मनाने‘ काहीही’ करण्यापासून ते कॉस्मेटिक सर्जरी, बोटोक्सची इंजेक्शन्स घेण्यापर्यंत कोणीही काहीही करतं. यात अर्थातच तरुणी आणि महिलांचं प्रमाण अख्या जगात सर्वाधिक आहे. कोणाला आपलं नाक सुंदर करायचं असतं, कोणाला आपले ओठ भरीव करायचे असतात, कोणाला आपलं वय लपवण्यासाठी त्वचेवरच्या सुरकुत्या घालवायच्या असतात..

अमेरिकेतील २६ वर्षांची विनी ओह ही एक तरुणी. ती भिन्नलिंगी असल्याचंही म्हटलं जातं. तिला आपला चेहरा आमूलाग्र बदलायचा होता, इतरांपेक्षा वेगळा बनवायचा होता. त्यात तिला परग्रहावरील एलियन्सचं प्रचंड आकर्षण होतं. तिनं ठरवलं, आपण ‘एलियन’च व्हावं. त्यासाठी तिनं काय काय करावं? आपला चेहेरा ‘एलियन’सारखा दिसावा, यासाठी तिनं आठ वर्षांत तब्बल शंभरपेक्षाही अधिक कॉस्मेटिक सर्जरीज स्वत:वर करवून घेतल्या. प्रत्येक सर्जरीगणिक आपण एलियन्सच्या अधिक जवळ जातोय, असं तिला वाटत होतं, त्यामुळे तिनं आपल्या शरीरावर एकामागोमाग एक प्लास्टिक सर्जरींचा सपाटाच लावला. या शस्त्रक्रियांसाठी प्रचंड पैसाही खर्च केला; पण तिला पाहिजे होतं, तसं झालं का? ‘एलियन लूक’ तिला मिळाला का? - तर हो. त्याचा तिला आनंदही झाला; पण ‘एलियन’ बनण्याच्या नादात तिनं आपलं अक्षरश: ‘भूत’ बनवून घेतलं. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी खरोखरच सुंदर दिसणाऱ्या विनीला पाहून आता अनेकांना भूताचा भास होतो. इतका की तिला पाहून अनेक जण घाबरतात: लहान मुलं तर तिच्याकडे फिरकतही नाहीत आणि ती दिसली की घाबरुन रडायला लागतात, इतकं तिनं आपलं रुपडं बदलून टाकलं आहे.

विनी म्हणते, मला आजही परग्रहावरील एलियन्सचं प्रचंड आकर्षण आहे. माध्यमांमध्ये खरे-खोटे जे काही फोटो, व्हिडिओ प्रसारित झाले, ते पाहून मी ठरवलं, आपणही तसंच बनायचं आणि त्या दिवसापासून माझं ते ध्येयच बनलं. माझं हे ध्येय मी जवळपास गाठलं आहे, असं मला वाटतं. परग्रहावरचे एलियन्स मी स्वत: पाहिले नाहीत, पण ते माझ्यासारखेच असतील, यावर माझा भरवसा आहे. ते जर कधी काळी पृथ्वीवर आले किंवा मी परग्रहावर गेले, तर तिथे असलेल्या एलियन्सना भेटायला आणि त्यांच्याशी दोस्ती करायला मला आवडेल. तेही मला त्यांच्यातलीच एक समजतील, असा मला भरवसा वाटतो..

आपला लूक बदलण्यासाठी किती खर्च आला, याचा हिशेबही विनीने ठेवलेला नाही, इतका अफाट पैसा तिनं स्वत:तल्या एलियन्ससाठी केला आहे. विनीला ओळखणारे जवळचे लोक आणि तज्ज्ञांच्या मते यासाठी तिनं लाखो डॉलर्स खर्च केले असावेत.. अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे राहणाऱ्या विनीबाबत डेली स्टारने एक मोठी स्टोरी प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या मते एलियन बनण्यासाठी विनीनं स्वत:वर पहिली शस्त्रक्रिया केली, तेव्हा ती १७ वर्षांची होती. त्यावेळी आपल्या ओठांवर फिलर्स लावून पहिल्यांदा तिनं आपल्या ओठांचा आकार बदलला. त्यानंतर शस्त्रक्रियांचा सिलसिला सुरूच राहिला.

विनीकडे पाहिल्यानंतर ती ‘एलियन’ असल्याचाच भास अनेकांना होतो. त्याविषयी ते तिला बोलूनही दाखवतात, पण विनीचं हे खरं रूप नाही, अट्टहासानं तिनं ते बदलून घेतलंय, हे ऐकल्यावर मात्र अनेकांचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. स्वत:च्या हातानंच स्वत:चं वाटोळं करून घेणारी ही मुलगी वेडी तर नाही, असंही अनेकांना वाटतं. स्वत:चं असं ‘भूत’ बनवून घेताना तिच्या आई-वडिलांनी, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तरी तिला रोखावं की नाही, म्हणून त्यांनी या नातेवाइकांवरही ताशेरे ओढले आहेत. ‘एलियन’ बनण्यासाठी विनीनं स्वत:च आपल्यावर शंभरपेक्षा अधिक शस्त्रक्रिया करवून घेतल्या, यावर सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसला नाही; पण विनीनं सोशल मीडियावर याबाबत स्वत:हून खुलासा केल्यावर अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकांनी तिला मूर्खात काढलं, तरी ‘आपल्याला जे वाटलं, ते करण्याच्या तिच्या जिद्दीबद्दल काहींनी तिचं कौतुकही केलं. आजही सोशल मीडियावरचा हा गदारोळ संपलेला नाही. विशेष म्हणजे विनीला स्वत:लाही सोशल मीडियावर सक्रिय राहायला खूप आवडतं. तिथे ती नेहमीच काही ना काही करीत असते. तिचं फॅन फॉलो्इंगही उत्तम  आहे. इन्स्टाग्रामवर जवळपास साठ हजार लोक तिला ‘फॉलो’ करतात.

रंग-रूप बदलण्याचा हव्यास!
आपल्या स्वत:च्या रूपात बदल करण्याचा, तरुण दिसण्याचा हव्यास अनेकदा लोकांना वास्तवाचं भान विसरण्यास भाग पाडतो, त्यातूनच स्वत:ला आहे तसं स्वीकारण्यापेक्षा असे अघोरी उपाय ते करतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपल्या भुवया जाड, उंच दिसण्यासाठी, ओठ भरीव दिसण्यासाठी अनेक जण बोटोक्सची इंजेक्शन्स घेतात. कोणाला आपली सैल झालेली त्वचा ताठ करायची असते, कोणाला ॲपल चिक्स हवे असतात, कोणाला आपलं हसणं आकर्षक करायचं असतं, कोणाला हनुवटी देखणी हवी असते, कोणाला त्वचेवरचे केस कायमचे घालवायचे असतात.. मग त्यावर उपाय काय? - तर कॉस्मेटिक सर्जरी!

Web Title: Hundreds of surgeries performed to become aliens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.