Burj Khalifa : दुबईतील बुर्ज खलिफा जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. ही इमारत बघण्यासाठी लोक दुरदुरून तिथे जातात. ही इमारत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहते. कधी यातील घरांच्या किंमतीमुळे, कधी त्यातील फर्निचरमुळे तर कधी आणखी काही कारणानं ही इमारत चर्चेत राहते.
बुर्ज खलिफा इमारतीमध्ये अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. तुम्हाला आठवत असेल की, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा फोटो त्याच्या वाढदिवसाला बुर्ज खलिफावर फ्लॅश करण्यात आला होता. त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडला असेल की, यावर कोण फोटो फ्लॅश करू शकतं आणि त्यासाठी काय करावं लागतं?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या इमारतीवर फोटो लावण्यासाठी तुम्ही सेलिब्रिटीच असायला हवं असं काही नाही. पैसे देऊन कुणीही या इमारतीवर फोटो झळकवू शकतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, यासाठी किती पैसे द्यावे लागतील? तेच जाणून घेऊ.
लल्लनटॉपवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये समोर आलं होतं की, दुबईतील मार्केटिंग एजन्सी Mullen Lowe MENA ही बुर्ज खलिफावर लायटिंग आणि डिस्प्लेचं काम बघते. या एजन्सीनं या प्रोसेसबाबत सांगितलं होतं.
या रिपोर्टनुसार, ८२८ मीटर उंच इमारत बुर्ज खलिफावर आपलं नाव किंवा फोटो दाखवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी अडीच लाख AED म्हणजेच आताच्या किंमतीनुसार, जवळपास ५८ लाख रूपये खर्च करावे लागतील. चौकशीनंतरच तुमचा फोटो इथे लावला जाईल.
ही किंमत केवळ वीक डेजसाठी लागू असते. म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत जर तुम्हाला रात्री ८ ते रात्री १० पर्यंत तीन मिनिटांचा संदेश लिहायचा असेल तर साधारण ५८ लाख रूपये द्यावे लागतील. तेच जर वीकेंड म्हणजे शनिवारी आणि रविवारी हाच संदेश लिहिण्यासाठी किंवा फोटो दाखवण्यासाठी तुम्हाला ८१ लाख रूपये द्यावे लागतील.
या दोन्ही किंमती केवळ तीन मिनिटांच्या जाहिरातीसाठी आहेत. जर तुम्हाला ५ मिनिटांची जाहिरात द्यायची असेल तर त्यासाठी कोणत्याही दिवशी रात्री ७ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत पाच मिनिटांचा संदेश बुर्ज खलिफावर दाखवू शकता. ज्यासाठी तुम्हाला २ कोटी ३३ लाख रूपये द्यावे लागतील.