हेट स्टोरी २ मुळे बलात्काराच्या घटना वाढतील - दत्ता
By Admin | Updated: July 22, 2014 15:22 IST2014-07-22T12:35:18+5:302014-07-22T15:22:34+5:30
हेट स्टोरी २ या चित्रपटामुळे लगेच प्रभावीत होणा-या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होईल व त्यामुळे महिलांवर अत्याचार व बलात्कारासारख्या घटना वाढू शकतील अशी भिती कर्नाटक विधानसभेत व्यक्त केली गेली.

हेट स्टोरी २ मुळे बलात्काराच्या घटना वाढतील - दत्ता
ऑनलाइन टीम
बंगळुरु, दि. २२ - बोल्ड दृष्यांमुळे चर्चेत असलेल्या हेट स्टोरी २ या चित्रपटामुळे लगेच प्रभावीत होणा-या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होईल व त्यामुळे महिलांवर अत्याचार व बलात्कारासारख्या घटना वाढू शकतील अशी भिती कर्नाटक विधानसभेत व्यक्त केली गेली आहे. या चित्रपटावर कर्नाटकमध्ये बंदी घालावी अशी मागणीच एका आमदाराने केल्याने पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरु असून सोमवारी विधानसभेच्या अधिवेशनात हेट स्टोरी २ या चित्रपटाचा विषय उपस्थित झाला. जनता दल सेक्यूलरचे आमदार वायएसव्ही दत्ता यांनी हेट स्टोरी २ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कर्नाटकमध्ये बंदी घालण्याचा विषय विधानसभेत उपस्थित केला. या चित्रपटातील काही सीन्स ऐवढे बोल्ड आहेत की त्यामुळे मनावर प्रभाव पडू शकतो व त्यातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली. दत्ता यांनी मांडलेल्या विषयावर कर्नाटकचे गृहराज्य मंत्री के.जे.जॉर्ज यांनी उत्तर दिले. जॉर्ज म्हणाले, पोलिस आयुक्तांना या चित्रपटातील बोल्ड सीन्स तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या अहवालानुसार आता पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे जॉर्ज यांनी सांगितले.
हेट स्टोरी २ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच वादाच्या भोव-यात सापडला होता. सेंसर बोर्डाने टीव्हीवर दाखवल्या जाणा-या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधील बोल्ड सीन्सवर आक्षेप घेतला होता. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी सेंसर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आता सेंसर बोर्डनंतर पोलिसांनीही चित्रपटाला कात्री लावल्यास सिनेसृष्टीत नवा वाद निर्माण होऊ शकतो.