इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती देण्यावर गुगलचा भर
By Admin | Updated: November 5, 2014 03:51 IST2014-11-05T03:46:12+5:302014-11-05T03:51:12+5:30
आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगलने इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती उपलब्ध करून देण्यासाठी काही वृत्तसंस्थांसह सरकारी संस्था सी-डॅकसोबत करार केला आहे,

इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती देण्यावर गुगलचा भर
नवी दिल्ली : आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगलने इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती उपलब्ध करून देण्यासाठी काही वृत्तसंस्थांसह सरकारी संस्था सी-डॅकसोबत करार केला आहे, तसेच गुगलवर आता हिंदीतही व्हाईस सर्च पर्याय उपलब्ध होणार आहे.
गुगल आगामी महिन्यात ही सेवा मराठी, तामिळ व बंगालीसह अन्य भाषांसाठीही उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. इंग्रजीत व्हाईस सर्चची सुविधा अगोदरपासूनच उपलब्ध आहे. गुगलचे भारतातील उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
ते म्हणाले, भारतात सुमारे २० कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. प्रत्येक महिन्याला ५० नवी वापरकर्ते यात सामील होतात आणि यापैकी १०० टक्के मोबाईलच्या मदतीने इंटरनेटचा वापर करत आहेत. हीच गती कायम राहिल्यास वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने भारत आगामी १२ महिन्यांत अमेरिकेस पिछाडी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात केवळ १९.८ कोटी लोक इंग्रजीमध्ये सक्षम आहेत, असे मानले जाते. यापैकी अधिकतर लोक इंटरनेटवर आहेत. या पार्श्वभूमीवर ‘इंटरनेट अलायन्स’ अर्थात आयएलआयए तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. हा समूह भारतीय (इंडिक) भाषांत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)