Gold Reserves in Odisha: ओडिशा आता भारताचे नवीन 'गोल्ड सेंटर' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अलिकडेच ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. ही माहिती भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI) ने दिली आहे.
ही माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकारमधील खाण मंत्री देखील विधानसभेत याबद्दल बोलले. मात्र, किती सोने आहे, याबद्दल कोणताही दावा करण्यात आलेला नाही. मात्र, असे म्हटले जात आहे की, हा सोन्याचा साठा १०-२० मेट्रिक टन (१००००० ते २००००० किलो) असू शकतो. मात्र, भारतातून होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत हा आकडा फार जास्त नाही.
सोने कुठे सापडले?ओडिशामधील देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट येथे साठे सापडले आहेत. याशिवाय, मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध येथे साठ्यांचा शोध अजूनही सुरू आहे.
भारत किती सोने आयात करतो?भारत दरवर्षी सुमारे ७००-८०० मेट्रिक टन सोन्याची आयात करतो. देशांतर्गत उत्पादन (२०२० पर्यंत) फक्त १.६ टन होते. याचा अर्थ असा की, ओडिशात आढळणारा हा साठा भारताच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम नाही. मात्र, देशांतर्गत खाणकामासाठी हे एक मोठे पाऊल आहे. ओडिशा सरकार, ओएमसी आणि जीएसआय लवकरच हा शोध व्यावसायिक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.