(Image Credit : www.amarujala.com)(प्रतिकात्मक फोटो)
सामान्यपणे काही कारणाने जर एखाद्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं गेलं तर फार फार काय होईल? एकतर विद्यार्था रडत बसेल नाही तर बोंबलत घरी जाईल. पण अमेरिकेतील एका मुलीने शाळेतून काढून टाकल्यावर असा काही कारनामा केला की, सगळेच हैराण झाले. ओक्लाहोमामधील ही घटना असून इथे एका मुलीने शाळेतून काढून टाकल्याच्या रागात एके-४७ रायफल खरेदी केली आणि ४०० लोकांना मारण्याची धमकी दिली, ज्यात तिच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
पिट्सबर्ग काउंटी शेरिफ कार्यालयाच्या एका रिपोर्टनुसार, १८ वर्षीय एलेक्सिस विल्सनने तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला सहकाऱ्याला सांगितले की, तिने एक सेमी ऑटोमॅटिक एके-४७ रायफल खरेदी केली आहे आणि मॅकएलेस्टरमध्ये तिला तिच्या शाळेतील लोकांवर गोळ्या झाडायच्या आहेत. तिने रायफलचा फोटोही सहकारी महिलेला दाखवला. सुदैवाने या महिलेने याबाबत लगेच पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी या मुलीला तिच्या घरून लगेच अटक केली. सोबतच तिच्या रूममधून रायफलसोबतच सहा उच्च क्षमतेच्या मॅगजीन आणि इतरही काही हत्यारं ताब्यात घेतली. चौकशी दरम्यान मुलीने सांगितले की, ती सहकारी महिलेला केवळ इतकंच सांगत होती की, रायफलला घाबरण्याची गरज नाही. पण तिने हे नाही सांगितले की, शाळेतील विद्यार्थ्यांसहीत ४०० लोकांना मारण्याची तिने धमकी का दिली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीवर खोटा आतंकवादी हल्ल्याचा आरोप लावत तिला स्थानिक तरुंगात दोन लाख ५० हजार डॉलर म्हणजेच एक कोटी ७८ लाख रूपयाच्या बॉन्डवर ठेवण्यात आलं आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीवर शाळेत चाकू घेऊन जाणे आणि तसेच तिच्या काही वस्तूंवर स्वस्तिक चिन्ह असल्याने तिला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. असे सांगितले जात आहे की, दोषी आढळल्यास तिला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.