इंग्लंड संघाला ‘भुता’ने पछाडले ?
By Admin | Updated: July 21, 2014 13:39 IST2014-07-21T01:55:05+5:302014-07-21T13:39:03+5:30
इंग्लंड क्रिकेट संघाला ‘आॅन फिल्ड आणि आॅफ फिल्ड’ भुताने झपाटले आहे. फिल्डवर त्यांच्या कामगिरीवर या भुताने परिणाम केल्याचा दावा स्पोटर्समेल वेबसाईटने केला आहे

इंग्लंड संघाला ‘भुता’ने पछाडले ?
लंडन : इंग्लंड क्रिकेट संघाला ‘आॅन फिल्ड आणि आॅफ फिल्ड’ भुताने झपाटले आहे. फिल्डवर त्यांच्या कामगिरीवर या भुताने परिणाम केल्याचा दावा स्पोटर्समेल वेबसाईटने केला आहे. इंग्लंडचे खेळाडू लँघम हॉटेलमध्ये राहिले होते आणि तिथेच या चर्चा रंगल्या आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक या इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंना याचा प्रत्यय आल्याचेही सांगण्यात आले.
भुताच्या भीतीने काही खेळाडूंनी वारंवार रूम बदलल्या आहेत. काही खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसीदेखील तिथे राहण्यास तयार नाहीत. त्यामुळे खेळाडूंची भीतीने झोप उडाली आहे आणि त्याचाच परिणाम श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्यांच्या कामगिरीवर झाल्याची चर्चा आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीदरम्यान ब्रॉडने रूम बदलली. रूममध्ये अचानक इतके उकडत होते की, मला झोपच लागत नसे. बाथरुममधील नळ अचानक सुरू होत असत. दिवे लावले तर ते आपोआप बंद होत. पुन्हा दिवे बंद केल्यावर तोच प्रकार होत असे. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो, असे ब्रॉडने सांगितले. ब्रॉडची गर्लफ्रेंड बॅली म्हणाली, तो सर्व प्रकार धक्कादायक होता आणि म्हणूनच मी लगेच रूम बदलण्यास सांगितले. मोईन अली याच्या पत्नीलाही असाच अनुभव आल्यामुळेच तिने येथे राहण्यासच नकार दिला. बेन स्टोक हाही याच हॉटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत होता आणि त्यानेही अशाच विचित्र घटनांमुळे रूम बदलली होती.
१८६५ साली वेल्सच्या राजाने लँघम हॉटेल उभारले. अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा या हॉटेलच्या उभारणीत हातभार असल्याने कमी कालावधीत त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र, आता या हॉटेलबाबत भुताच्या गोष्टींनी प्रसिद्धी मिळविली आहे. हॉटेलच्या कॉरिडोर आणि रूममध्येही भूत असल्याच्या चर्चा रंगल्या. येथे मधुचंद्रासाठी आलेल्या जर्मन डॉक्टरने त्याच्या पत्नीची हत्या करून आत्महत्या केली होती. तसेच एका सैनिकाने येथील रूमच्या बाल्कनीमधून उडी घेऊन आत्महत्या केली होती, या जुन्या घटनाही आता नव्याने चर्चिल्या जात आहेत.