५० हजारांसाठी आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण
By Admin | Updated: June 30, 2014 12:50 IST2014-06-30T00:41:07+5:302014-06-30T12:50:22+5:30
५० हजार रूपयांकरिता मित्राच्याच आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर अधिक रकमेची दोन दिवसांपासून मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्या जोडप्याला राष्ट्रीय स्वयंसेवक

५० हजारांसाठी आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण
संघ स्वयंसेवकांनी पकडले अपहरणकर्ते जोडपे : धामणगाव रेल्वे स्थानकावरील घटना
धामणगाव रेल्वे : ५० हजार रूपयांकरिता मित्राच्याच आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर अधिक रकमेची दोन दिवसांपासून मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्या जोडप्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी रेल्वे प्रवासादरम्यान पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले़
अतुल आनंद काटे व त्याची पत्नी विशाखा, असे अटकेतील जोडप्याची नावे आहेत. नागपूर येथील मानेवाडा भागात राहणारे मनोज वैरागडे यांची आठ महिन्यांची चिमुकली परी ही घरी खेळत होती.
गुरूवारी दुपारी ३ वाजता याच भागात भाड्याने खोली करून राहणारा मनोजचा मित्र अतुल आनंद काटे व विशाखा या जोडप्याने मुलीला आम्ही खेळाला नेत असल्याचा बहाणा करुन सोबत नेले.
दोन तासानंतरही परत न आल्याने आपल्या चिमुकलीचे मित्रानेच अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. मनोज यांनी शुक्रवारी नागपूरच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. अपहरण झालेली चिमुकली परी व अपहरणकर्त्या जोडप्यांचा शोध पोलीस घेत होते. शुक्रवारी दुपारी अपहरणकर्त्या अतुल व त्याची पत्नी विशाखाचा फोन मनोजला आला. तुमच्या मुलीचे अपहरण केले असून मुलगी हवी असल्यास पन्नास हजार रुपये आपल्या बँक खात्यात जमा करण्याची धमकी देण्यात आली. मनोजने त्वरित तीस हजार रूपये अपहरणकर्त्या जोडप्याच्या नागपूर येथील युनियन बँकेच्या खात्यात जमा केले़
धामणगाव शहरात विदर्भस्तरीय तीन दिवसीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांतीय बैठक सुरू आहे़ नगर कार्यवाह गोपाल विजयप्रकाश भैया यांना नागपूर येथील त्यांचे मेहुणे नरेंद्र गांधी यांचा फोन आला. ते अपहरणकर्ते जोडपे रविवारी अकोला येथून नागपूरला गोंडवाना एक्सपे्रसने जात असल्याचे अर्ध्या तासापूर्वी सांगितले़
क्षणाचाही विलंब न लावता गोपाल भैया यांनी दीडशे स्वयंसेवकांसह धामणगाव रेल्वे स्टेशन गाठले. ही प्रवासी गाडी रेल्वे स्टेशनवर येताच स्वयंसेवकांनी ती तपासली. बोगी क्रमांक एस-७ मध्ये अपहरणकर्ते जोडपे मुलीला घेऊन बसले होते. या स्वयंसेवकांनी मुलीला आपल्याजवळ घेऊन त्वरित अपहरणकर्त्या जोडप्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले़ (तालुका प्रतिनिधी)