लहान आकाराच्या कंडोममुळे आफ्रिकेत एड्सप्रतिबंध करण्यास अडचण
By Admin | Updated: September 19, 2014 19:51 IST2014-09-19T18:29:13+5:302014-09-19T19:51:44+5:30
एचआयव्ही एड्स ही आफ्रिकेतील महत्वाची डोकेदुखी आहे. एचआयव्ही एड्सवर प्रतिबंध म्हणून जे काही उपाय आहेत त्यामध्ये शरीर संबंध ठेवताना कंडोम वापरणे हा एक आहे

लहान आकाराच्या कंडोममुळे आफ्रिकेत एड्सप्रतिबंध करण्यास अडचण
>ऑनलाइन लोकमत
कंपाला (पूर्व आफ्रिका), दि. १९ - एचआयव्ही एड्स ही आफ्रिकेतील महत्वाची डोकेदुखी आहे. एचआयव्ही एड्सवर प्रतिबंध म्हणून जे काही उपाय आहेत त्यामध्ये शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे हा एक आहे. आफ्रिकेतील पुरुषांना कंडोम त्यांच्या आकाराचे मिळत नसल्याने एचआयव्ही एड्सला प्रतिबंध करण्यास समस्या उद्भवत असल्याचे येथील खासदारांनी सांगितले आहे. खासदार टॉम अझा यांनी असे सांगितले की, काही दिवसांपूर्वीच युगांडाच्या संसदेतील एचआयव्ही एड्स प्रतिबंधक समितीने केलेल्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की, एकाच आकाराचे कंडोम सर्वलोकांना वापरता येणे अशक्य आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगळी असल्याने त्यांच्या शरीररचनेनुसार कंडोमचा आकारही बदलते. कंडोमचा अयोग्य आकार हे एचआयव्ही एड्स पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
त्याचप्रमाणे येथील युवकांशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की, शरीरसंबंधांदरम्यान कंडोम फाटल्यानेही अडचणी येतात. युवकांनी एड्स प्रतिबंध समितीला असे सांगितले की, वेगवेगळ्या आकाराचे कंडोम मिळाल्यास एचआयव्ही एड्सची समस्या सुटण्यास हातभार लागेल. कंडोमच्या मापावरून समस्या उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मुंबईत २००६ साली इंडियन काऊंसील ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या एका पाहणीत ६० टक्के लोकांना आंतरराष्ट्रीय कंडोमच्या आकारापेक्षा कमी आकाराचे कंडोम लागत असल्याचे निदर्शनास आले होते. तर, ३० टक्के लोकांना कंडोमच्या आकारामुळे समस्या येत होती. फक्त युगांडामध्ये एड्समुळे दगावणा-या लोकांची संख्या ८० हजार इतकी होती. युगांडा सरकारने राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये जोडीदाराशी एकनिष्ठ असणे, व कंडोम वापरण्यावरभर दिला होता. या प्रतिबंधात्मक उपचारांमुळे एड्सने दगावणा-यांची संख्या आटोक्यात आली. एड्समुळे पालक दगावल्याने अनेक मुलं अनाथ होत होती. प्रतिबंधात्मक योजनेमुळे ही समस्याही आटोक्यात आली आहे.