फिलिपीन्समधील सक्रिय ज्वालामुखींपैकी एक 'ताल' ज्वालामुखीमुळे मनीलाच्या आजूबाजूची परिस्थिती वाईट झाली आहे. पण असं असूनही लोक जीवनाचा आनंद साजरा करत आहेत. येथील एका कपलने ज्वालामुखी फुटण्यादरम्यानच लग्नगाठ बांधली. हा ज्वालामुखी इतका जवळ आहे की, त्यांच्या फोटोशूटमध्ये या ज्वालामुखीतून राख आकाशात उडताना बघितली जाऊ शकते. या कपलच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोग्राफर रांडोल्फ इवनने सांगितले की, ही राख त्यांच्या कपड्यांवरही पडत होती. सगळे पाहुणे शांततेत सगळे रितीरिवाज पूर्ण करत होते.
किती अंतरावर होता ज्वालामुखी
चिनो आणि काट वाफ्लोर यांचं विवाह स्थळ ज्वालामुखी फुटण्याच्या ठिकाणापासून केवळ १० किमी अंतरावर होतं. रविवारी काढण्यात आलेल्या या फोटो ज्वालामुखीतून निघालेली राख आकाशात उडताना दिसत आहे. ताल लेकवर असलेल्या या ज्वालामुखीच्या फुटण्याने मनीलातील वातावरण फारच खराब झालं आहे. याचा लाव्हा साधारण १० ते १५ किलोमीटर दूरपर्यंत पसरला आहे. प्रशासनाने सुरक्षेसाठी ८ हजार लोकांना तेथून बाहेर काढलं आहे.
क्षणाक्षणाची घेत होते माहिती
फोटोग्राफर इवनने सांगितले की, या दरम्यान आम्ही अस्वस्थ होतो. ज्वालामुखीच्या फुटण्याबाबतची प्रत्येक माहिती आम्ही सोशल मीडियावर लागोपाठ चेक करत होतो. जेणेकरून आम्हाला वॉर्निंग आणि वाढत्या धोक्याबाबत माहिती मिळावी. आम्ही आपसात हे बोलत होतो की, स्थिती अधिक वाईट झाली तर काय करायचं. पण पाहुणे सगळेच शांत होते. चिनो आणि काट यांना या स्थितीतही लग्न करायचं होतं.
खराब वातावरणामुळे शाळा-ऑफिसेस बंद
फिलिपिन्सच्या सरकारने आजूबाजूच्या परिसरातील पसरलेली राख आणि खराब हवा बघता सरकारी ऑफिसेस आणि शाळांना सुट्टी दिली आहे. डॉक्टरांना श्वासासंबंधी समस्येचा सामना करणाऱ्या रूग्णांची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लोकांना घरातच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.