एक काळ होता, जेव्हा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं मानलं जात होतं. त्यामुळे विवाह हा एक पवित्र संस्कार होता आणि विवाहविच्छेद किंवा घटस्फोटाचा विचार कोणाच्या डोक्यातही येत नसे. एकदा का लग्न झालं की कितीही मतभेद, मनभेद असले तरी संसार अंतापर्यंत टिकवला जायचा.
काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या. शिक्षणामुळेही फार मोठा फरक पडला. प्रत्येकाला आपापली स्पेस हवीशी वाटू लागली. ती अत्यावश्यकही आहेच. विचार बदलले, अनावश्यक ओझी बाळगणं अनेकांना नकोसं झालं. त्यामुळे ‘नाही पटत आपलं, तर होऊया वेगळं’ हा दृष्टिकोन वाढत गेला. संपूर्ण जगभरात घटस्फाेटांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं. अनेक ठिकाणी तर लग्नानंतर काही महिन्यांत किंवा काही वर्षांत जोडपी स्वतंत्र राहू लागल्याचं प्रमाणही वाढलं. न्यायालयात घटस्फोटांच्या तक्रारी घेऊन लोकं खेट्या मारू लागले. अर्थातच घटस्फाेटाची प्रक्रियाही सोपी नाहीच. त्यात बराच काळ जातो. होताहोईतो जोडप्यांनी आपलं नातं टिकवून ठेवावं, छोट्या छोट्या गोष्टींवरून स्वतंत्र होण्याचा किंवा घटस्फोटाचा विचार करू नये, असा न्यायालयांचाही हेतू असतो. कुटुंबव्यवस्था टिकून राहावी, हे यामागचं मोठं आणि महत्त्वाचं कारण. त्यामुळे घटस्फोट आणखी लांबणीवर पडतो. पण आजकाल अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेण्याचं नक्की केलं, की मग त्यांना कुठल्याही कारणानं आपलं नातं पुन्हा जुळवण्यात रस नसतो. त्यात पैसा आणि वेळ खूप मोठ्या प्रमाणात वाया जातो. बऱ्याचदा काही जोडप्यांना सहमतीनं घटस्फोट घेऊन आपापलं स्वतंत्र आयुष्य सुरू करायचं असतं, नवं नातं जोडायचं असतं; पण त्यांनाही घटस्फोटाच्या या साऱ्या प्रक्रियेतून जावंच लागतं. पण घटस्फोट जर लवकर हवा असेल तर काय करायचं? त्यासाठी साधी, सोपी, सुटसुटीत अशी काही प्रक्रिया नाहीच; पण नेदरलँडमधल्या एका हॉटेलनं त्यासाठी एक अगदी अफलातून उपाय शोधून काढला आहे.
नेदरलँडमधला एक ‘हुशार’ व्यापारी! जिम हाफेन्स हे त्याचं नाव. त्यानं घटस्फोटातही पैसे कमावण्याची एक नवी संधी शोधली आणि एक ‘डिव्होर्स हॉटेल’च तयार केलं. काय आहे याची प्रोसेस? अगदी सोपं! अनेक विवाहित दाम्पत्यं इथे शुक्रवारी चेक इन करतात आणि रविवारपर्यंत घटस्फोट घेऊन चेक आउटही करतात!
त्यासाठीची सगळीच व्यवस्था त्यांनी तिथे केलेली आहे. अगदी वकिलांपासून ते समुपदेशन आणि कायदेशीर मदतीपर्यंत! या हॉटेलमध्ये घटस्फोटाचं संपूर्ण पॅकेजचं दिलं जातं. वकिलांची आणि मध्यस्थांची मोठी टीम तिथे आधीपासूनच तयार असते. त्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागतं, ते म्हणजे घटस्फोटासाठी तुमची तयारी असली पाहिजे आणि त्यांच्या पॅकेजप्रमाणे पैसे देण्याची तुमची कुवत असली पाहिजे. तेवढं तुम्ही केलंत, की ज्या गोष्टींना दोन-दोन वर्षं निघून जातात, ते काम दोन दिवसांत पूर्ण करून जोडपी ‘आनंदानं’ तिथून निघून जातात!
जिम हाफेन्स यांचं म्हणणं आहे, आम्ही इथे लोकांचे संसार आणि त्यांचे विवाह तोडण्यासाठी बसलेलो नाही; पण ज्या दाम्पत्यांचं एकमेकांशी पटतच नाही, ज्यांना सोबत राहायचंच नाही आणि ज्यांना आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची आहे, त्यांना आणखी त्रासात टाकणं हेदेखील चुकीचंच आहे. कायदेशीर कटकटीतून आणि जाचातून आम्ही त्यांना लवकर मुक्त करतो इतकंच. शिवाय आम्ही इथे त्यांना कायदेशीर सल्ला, मानसिक आधार आणि मेडेटेशनची सोयही उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय तुम्हाला आपलं नातं टिकवायचं आहे का, आपल्यातला दुरावा संपवण्यासाठी तज्ज्ञांची मदत हवी आहे का, जेणेकरून तुमचं नातं, विवाह टिकू शकेल, यासंदर्भातही विचारून आम्ही त्यांना मदत करतो. पण या गोष्टीला त्यांची तयारी नसेल, तर आम्ही त्यांच्या भावी आयुष्याची वाट तातडीनं आणि शांततापूर्ण मार्गानं सुकर करून देतो.
नेदरलॅण्डच्या हर्मोन शहरात हे हॉटेल आहे. ‘द सेप्रेशन इन’ या नावानंही हे हॉटेल ओळखलं जातं. केवळ नेदरलॅण्डमध्येच नाही, तर संपूर्ण जगातच या हॉटेलचा सध्या बोलबाला आहे. आता जगात इतरही ठिकाणी अशा प्रकारची हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात तयारी सुरू झाली आहे..
घटस्फोट? - नव्या आयुष्याची सुरुवात! या हॉटेलची फी आहे साधारण १० ते १५ हजार डॉलर्स. या हॉटेलच्या वेबसाइटवर म्हटलं आहे, विवाहविच्छेदन करणं किंवा घटस्फोट घेणं.. केवळ या एकाच हेतूनं लोकं इथे येत नाहीत, तर आपल्या आयुष्याची नव्यानं सुुरुवात करण्यासाठीही अनेक दाम्पत्यं इथे येतात. जो काही निर्णय असेल तो त्या दाम्पत्यांचा असतो. त्यांच्या अवघड क्षणी आम्ही त्यांना तातडीनं मदत करतो एवढंच. त्यानंतर आनंदानं ते इथून जातात..