ट्रेन, बस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी प्रवास करताना लोक प्रेमात पडतात असं आपण नेहमीच ऐकतो. पण आता एक हटके लव्हस्टोरी समोर आली आहे. तरुणी एका डिलिव्हरी बॉयच्या प्रेमात पडली आणि दोघांनीही लग्न केलं आहे. अमेरिकेतील तरुणी चीनमधील तरुणाच्या प्रेमात वेडी झाली. तरुणीने जेवणासाठी न्यूडल्सची ऑर्डर दिली होती. याची डिलिव्हरी याच तरुणाने आणली.
चीनमध्ये राहणाऱ्या डिलिव्हरी बॉयने ज्या तरुणीशी लग्न केलं आहे ती अमेरिकेची असून नर्सरी टीचर आहे. विशेष म्हणजे दोघांनाही एकमेकांची भाषा येत नव्हती. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, लिऊ नावाचा हा तरुण २७ वर्षांचा आहे आणि हना हॅरिस ही ३० वर्षांची आहे. एके दिवशी हनाने जेवण ऑर्डर केलं होतं जे लिऊने आणलं होतं. यानंतर त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली.
लिऊ जेवणाची ऑर्डर आणतो तेव्हा हना लिफ्टमध्ये असते. लिफ्टमध्ये दोघांची भेट होते. लिऊला इंग्रजी येत नाही, त्यामुळे तो पहिल्यांदाच "हॅलो! आय लव्ह यू" म्हणतो. हे ऐकून हॅरिस हसते आणि इथूनच त्यांचं प्रेम सुरू होतं, त्यानंतर ते एकमेकांना भेटतात. हॅरिस चिनी भाषा आणि लिऊ इंग्रजी भाषा शिकतात. हॅरिस चिनी भाषा शिकण्यासाठी लिऊशी मैत्री करते आणि लिऊला देखील इंग्रजी शिकण्यासही मदत होते.
भेटी दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे ही गोष्ट लग्नापर्यंत पोहोचते आणि दोघंही लग्न करतात. आता दोघेही ट्रान्सलेशन एपद्वारे एकमेकांशी बोलतात आणि एकमेकांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेमासाठी भाषेची गरज नसते हे आता सिद्ध झालं आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.