चंद्राबाबू नव्या आंध्रचे मुख्यमंत्री

By Admin | Updated: June 9, 2014 03:38 IST2014-06-09T03:38:43+5:302014-06-09T03:38:43+5:30

तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुनर्रचित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून रविवारी नागार्जुनगर येथील एका सोहळ्यात शपथ घेतली.

Chief Minister of Chandrababu New Andhra | चंद्राबाबू नव्या आंध्रचे मुख्यमंत्री

चंद्राबाबू नव्या आंध्रचे मुख्यमंत्री

विजयवाडा : तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुनर्रचित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून रविवारी नागार्जुनगर येथील एका सोहळ्यात शपथ घेतली.
राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहम यांनी चंद्राबाबू नायडू यांना सायंकाळी ७.२७ वाजताच्या शुभमुहूर्तावर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्याला अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
नायडू यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात तेलगू भाषेत शपथ घेतली. याप्रसंगी १९ कॅबिनेट मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. नायडूंनी तेलगू ताल्ली यांच्या पुतळ्याला दंडवत घातला.
आचार्य नागार्जुन विद्यापीठाच्या समोरील ७० एकराच्या खुल्या जागेत हा सोहळा पार पडला. प्रचंड उकाडा असताना देखील या अभूतपूर्व सोहळ्याला लाखो जनतेने हजेरी लावली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, एम. वेंकय्या नायडू, अनंतकुमार, कलराज मित्र, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. झेलिंग आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच इतर नेते उपस्थित होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Chief Minister of Chandrababu New Andhra