(Image Credit : thebetterindia.com)
आपण सगळेच ज्याप्रमाणे फिरण्यासाठी उत्सुक राहतो, त्याचप्रमाणे चांगल्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन टेस्टी पदार्थ खाण्याचीही आपल्याला उत्सुकता लागलेली असते. अलिकडे रेस्टॉरन्टमध्ये पदार्थ तर चांगले मिळतातच, सोबतच हॉटेल्सचं इंटेरिअर डिझायनिंगही चांगलं असतं. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका अतरंगी हॉटेलबाबत सांगणार आहोत, जिथे जेवणासाठी पैसे घेतले जात नाहीत.
छत्तीसगडमधील अंबिकापूर हे चांगलंच प्रसिद्ध शहर आहे. भारतात हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येतं. आता या शहरात आणखी एक खास गोष्ट सुरू झाली आहे. इथे भूकेलेल्यांना जेवण दिलं जातं आणि पर्यावरणाला वाचवण्याचं काम केलं जातं.
अंबिकापूर शहरातील कलेक्टर मनोज सिंह आणि त्यांची मुलगी कामयानी यांनी एक अनोखा कॅफे सुरू केला आहे. ज्यात १ किलो प्लॅस्टिक दिल्यावर देवण फ्री दिलं जातं. तेच १.५ किलो प्लॅस्टिक दिल्यानंतर तुम्हाला सकाळी नाश्ताही दिला जातो. या कॅफेचा उद्देश जास्तीत जास्त प्लॅस्टिक जमा करणं हा आहे. नंतर या प्लॅस्टिकचा वापर रोड बनवण्यासाठी केला जाईल. या कॅफेचं नाव आहे 'गार्बेज कॅफे'.
छत्तीसगडमध्ये याआधीही प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतात जवळपास 100000 किमीचे प्लॅस्टिकपासून रस्ते तयार करण्यात आले आहेत. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची फार हानी होते. एका रिसर्चनुसार, प्लॅस्टिकचे रस्ते सामान्य रस्त्यांच्या तुलनेत तीन पटीने अधिक काळ टिकतात.