देश कोणताही असो, जर तुम्ही तिथे आपली एखादी वस्तु हरवलीत तर ती परत मिळवणे अशक्यप्राय असते. त्यातही एखादे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल, तर मग आशाच सोडावी लागते. मात्र, आता एका ब्रिटिश युट्यूबरने त्याचे हरवलेले एअरपॉड्स एका वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर शोधून काढले आहेत. एका वर्षापूर्वी दुबईतून हरवलेले त्याचे हे एअरपॉड्स चक्क पाकिस्तानात जाऊन पोहोचले आहेत. या युट्यूबरने पोस्ट लिहून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. इतकंच नाही तर तो आपले एअरपॉड्स परत मिळवण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहे.
या ब्रिटिश युट्यूबरला त्याचे एअरपॉड्स इतके प्रिय आहेत की, ते हरवल्या दिवसापासून तो त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अखेर एका वर्षाच्या मेहनतीनंतर त्याला त्याच्या एअरपॉड्सचा ठावठिकाणा कळला आहे. एक पोस्ट लिहून त्याने या घटनेची संपूर्ण माहिती सगळ्यांना दिली.
नेमकं काय घडलेलं?माइल्स या ब्रिटिश युट्यूबरने आपल्या पोस्टमध्ये घटनाक्रम सांगताना म्हटले की, "एका वर्षापूर्वी दुबईच्या एका हॉटेलमधून माझे एअरपॉड्स चोरीला गेले होते. यानंतर मी अॅप्पलच्या फाईंड माय अॅप आणि लॉस्ट मोडकहा उपयोग करून एअरपॉड्सचे लोकेशन ट्रक करायला सुरुवात केली होती. आता माझे एअरपॉड्स पाकिस्तानच्या झेलम भागात पोहोचले आहे. तिथल्या सेकंड वाईफ नामक एका हॉटेलजवळ तर ट्रक झाले आहेत. मी पोस्ट लिहिण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत ते तिथेच सुरू होते."
आता आपले एअरपॉड्स परत मिळवण्यासाठी माइल्सने थेट पाकिस्तानला जाण्याची घोषणा केली आहे. याबद्दल लिहिताना तो म्हणाला की, "आता हे प्रकरण केवळ ट्रॅकिंग पुरतं मर्यादित राहणार नाही. मी आता तिथल्या पोलिसांशी संपर्क करून माझे एअरपॉड्स परत घेण्यासाठी जाणार आहे. या सगळ्याच व्हिडीओ देखील मी बनवणार आहे. मला असे चोर लोक अजिबात आवडत नाहीत."
नेटकरी म्हणाले...
माइल्सच्या या पोस्टवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "जर तुम्ही पाकिस्तानला जाण्यासाठी खर्च करत असलेल्या रकमेच्या २ टक्के रक्कमही खर्च केली, तर तुम्हाला नवीन एअरपॉड्स मिळू शकतात." दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "भाऊ, तू ते एअरपॉड्स पुन्हा कधीही कानात घालणार नाहीस."आणखी एका युजरने गंमतीत लिहिले की, "तुमचे एअरपॉड्स सेकंड वाईफ रेस्टॉरंटजवळ आहेत, तेव्हा त्यांच्यासोबत काय काय झाले असेल समजून जा."