लग्नातील महागड्या गिफ्ट्सचा त्याग करत बेंगळुरूच्या श्रुतीने जे केलं त्याचं करावं तेवढं कौतुक कमी ठरेल. २९ वर्षीय श्रुती पार्थासारथीचं २६ जानेवारीला लग्न होतं. तिने तिच्या लग्नात गिफ्ट्स घेतले नाहीत. त्याऐवजी तिने लोकांना डोनेशन करण्यास सांगितले. लग्नपत्रिकेच्या माध्यमातूनच तिने पाहुण्यांना वाइल्डलाईफ हॉस्पिटलसाठी डोनेशन करण्याचं आवाहन केलं होतं.
लग्नाच्या दिवश श्रुतीने मंडपात डोनेशनसाठी प्रॉपर व्यवस्थाही केली. हा डोनेशन स्टॉल Animals Wildlife Hospital & Rescue Centre साठी होता. या भन्नाट आणि भारी कामाबाबत श्रुती फारच समर्पित आहे.
लग्नाच्या तीन महिन्यांपूर्वीची घटना आहे. श्रुतीला रस्त्याने जाताना एक जखमी खार दिसली. श्रुतीने लगेच PFA ला संपर्क केला आणि काही लोक आहेत. ते खारीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तीन दिवसांनंतर श्रुती खारीला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली. तेव्हा खार पूर्णपणे बरी झाली होती.
तेव्हाच श्रुतीला एक आयडिया आली आणि तिने PFA च्या लोकांना बोलवून लग्नात स्टॉल लावण्याचा आग्रह केला. जेणेकरून येणारे पाहुणे डोनेशन देऊ शकतील आणि याचा फायदा हॉस्पिटलला होईल.
श्रुतीने याबाबत सांगितले की, 'माझा आधीपासूनच प्राण्यांवर विशेष जीव आहे. एकदा मी पाहिलं की, काही कुत्रे दुसऱ्या लहान कुत्र्यांवर हल्ला करत होते. हे पाहून आम्ही त्यांना वाचवलं आणि घरी घेऊन गेलो. आता ते तिनही लहान कुत्री ६ वर्षांचे झाले आहेत. मला प्राण्यांसाठी काहीतरी करायचं होतं आणि ते यापेक्षा चांगलं काय असू शकतं? असं करून लोकांमध्ये जागरूकताही येऊ शकते.
श्रुतीने लग्न पत्रिकेतच येणाऱ्या पाहुण्यांना आवाहन केलं की, कृपया आम्हाला आशीर्वादासोबतच वन्यजीव आणि पर्यावरण वाचवण्यासाठी डोनेशनही द्या. यासाठी आम्ही PFA साठी फंडरेजरचं आयोजन केलं आहे. लग्नातील हा स्टॉल पाहून लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी स्वयंसेवकांसोबत संवाद साधला आणि डोनेशनही दिलं.
श्रुतीची आई आणि तिच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलसाठी २५ हजार रूपये डोनेशन दिलं आणि लग्नाला आलेल्या पाहुण्यांकडून १७ हजार रूपये जमा झालेत. इतकेच नाही तर श्रुतीने Voice of Stray Dogs साठी ऑनलाइन फंडही जमा केला होता. ही प्राण्यांना वाचवणारी एक खाजगी संस्था आहे. यात तिला क्राउडफंडिंगच्या माध्यमातून २५ हजार रूपये मिळाले होते.