बीडीडीचा शिमगा ‘लिम्का बुक’मध्ये !
By Admin | Updated: January 28, 2015 01:36 IST2015-01-28T01:29:57+5:302015-01-28T01:36:42+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक भान जपत समाजातील वाईट कृत्यांची प्रतिकृती असणाऱ्या वरळीच्या बीडीडी चाळीच्या ‘होळी’ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.

बीडीडीचा शिमगा ‘लिम्का बुक’मध्ये !
संयुक्ता आंबेरकर, मुंबई
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक भान जपत समाजातील वाईट कृत्यांची प्रतिकृती असणाऱ्या वरळीच्या बीडीडी चाळीच्या ‘होळी’ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. बीडीडी चाळीचे रहिवासी असणारे चंद्रकांत अवघडे सामाजिक घडामोडींवर प्रकाशझोत टाकणारी होळी उभारत आहेत. याच होळीची नोंद आता लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. गेल्या वर्षी बीडीडी चाळीच्या आवारात साकारलेल्या ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील भ्रष्टाचार’ या संकल्पनेवरील होळीला हा सन्मान प्राप्त झाला आहे.
१९८२ पासून चंद्रकांत अवघडे कसोशीने दोन चाळींमध्ये कित्येक फूट उंच होळी उभारत आहे. यापूर्वी कसाबची फाशी, त्सुनामी, स्वाइन फ्लू, दिल्ली सामूहिक बलात्कार अशा अनेक विषयांवर त्यांनी ही होळी साकारली आहे. शिमग्याच्या एक-दीड महिना आधीपासून संकल्पना, तयारी आणि मांडणी याची धडपड या चाळींच्या आवारात दिसून येते. मुंबई - उपनगरांतून खास ही होळी पाहण्यासाठी मुंबईकर एकच गर्दी करतात.
चंद्रकांत अवघडे व्यवसायाने आर्टिस्ट असून ते शिल्पकला, कला दिग्दर्शन अशा कलेच्या विविध क्षेत्रांत काम करतात. गेल्या वर्षी अवघडे यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात केलेला घोटाळा या संकल्पनेवर आधारित सुब्रतो रॉय यांची प्रतिकृती साकारली होती. ही होळी ५२ फूट (१५.८२ मीटर) उंच व १६ फूट (४.८८ मीटर) रुंद अशी भव्य होळी साकारली होती. या रेकॉर्डविषयी अवघडे म्हणाले, की एवढ्या वर्षांच्या आमच्या टीमच्या मेहनतीला मिळालेले हे फळ आहे. यामुळे कामाचा उत्साह वाढला आहे. सामाजिक घडामोडींबद्दलचा लोकांचा रोष या होळीच्या माध्यमातून व्यक्त होतो.