वंचितांसाठी भरतेय 'वीटभट्टी शाळा'

By Admin | Updated: November 20, 2014 14:45 IST2014-11-20T14:31:31+5:302014-11-20T14:45:02+5:30

डॉ. प्रकाश आमटे यांच्या चित्रपटातून स्फूर्ती घेत अहमदनगरमधील ज्येष्ठांनी वीटभट्टीवर राब-राब राबणार्‍या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपड सुरू केली.

'Bhatbhatti school' filled with gratitude | वंचितांसाठी भरतेय 'वीटभट्टी शाळा'

वंचितांसाठी भरतेय 'वीटभट्टी शाळा'

नागेश सोनवणे ■ अहमदनगर

डॉ. प्रकाश आमटे यांचा चित्रपट पाहिला अन् आपल्या आसपास हे असे 'हेमलकसा'मध्ये अनेक वंचित आहेत. जे मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. यातून स्फूर्ती घेत त्यांनी वीटभट्टीवर राब-राब राबणार्‍या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपड सुरू केली. यातूनच साकारली 'वीटभट्टी शाळा' शिक्षणाचा कायदा गावीही नसणार्‍या मजुरांची पोरं आता या शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवत आहेत. ही वास्तव कथा आहे. केडगाव लिंक रोडलगत असणार्‍या वीटभट्टीतील. अँड. शिवाजी डमाळे व त्यांच्या पत्नी विजया डमाळे, डॉ. विजय गिते, नवृत्त पोलीस अधिकारी एस.एल. दळवी ही भूषणनगरमधील ज्येष्ठ मंडळी लिंकरोडवर रोज फिरायला जात. तेथे शेटे यांच्या वीटभट्टीवर काम करणार्‍या मजुरांची २0 ते २५ लहान मुले त्यांच्या नजरेस पडली. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी त्यांचा जीव तळमळू लागला. अशातच डॉ. प्रकाश आमटे यांचा चित्रपट डमाळे दांपत्याच्या पाहण्यात आला. त्यात आमटे यांनी हेमलकसा या आदिवासी भागात जाऊन त्यांच्या मुलासाठी केलेल्या कार्यातून स्फूर्ती घेत आपल्या परिसरातही असे हेमलकसा असून, तेथेही शिक्षणापासून वंचित असलेले, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेली या वीटभट्टीवरील मुले त्यांच्या डोळ्यासमोर उभी ठाकली आणि मग या ज्येष्ठ मंडळींनी विचार-विनिमय करून या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी धडपड सुरू केली आणि त्यांनी मुलांसाठी खाऊ, शालेय साहित्य, वह्या, पेन, पाटी आणि पेन्सील, शालेय पुस्तके स्वखर्चाने घेऊन त्या मुलांना वाटली. २0 ते २५ मुले गोळा झाली. 
या मुलांच्या पालकांचे ना गाव ना पत्ता. या गावावरून त्या गावाला काम करायचे अन् पोटाची खळगी भरायची. यात कुठले आलेय पोरांचे शिक्षण अन् त्यांची शाळा. शिक्षणाचा कायदा झाला हे त्यांच्या गावी नाही आणि मग डमाळे व त्यांच्या सहकार्‍यांचे रोजच सकाळी भट्टीवर जायचे, मुले गोळा करायची. झाडाखाली सर्वांना एकत्र रांगेत बसवायचे अन् मग त्यांच्याकडून प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत हे म्हणवून घेऊन त्यांचे अक्षर ओळख, अंक ओळख, बाराखडी असे शिक्षणाचे धडे सुरू करायचे असे आता रोजच सुरू झाले आहे. डमाळे व त्यांच्या सहकार्‍यांचा तो दिनक्रमच बनून गेलाय आणि मुलेही आनंदाने एकत्र बसून शिक्षणाचा श्रीगणेशा मोठय़ा उत्साहाने गिरवत आहेत. खरीखुरी शाळा नसली तरी झाडाखालची ही मुलखावेगळी वीटभट्टी शाळा मुलांना आता फारच आवडू लागली आहे.
एकीकडे शासन पातळीवर शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा खटपट करीत असते. ही यंत्रणा मात्र अशा वंचित मुलांपर्यंत कशी पोहचली नाही? असा प्रश्न अँड.डमाळे यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकार्‍यांनाही दिले निवेदन
■ अँड.शिवाजी डमाळे यांनी वीटभट्टीत काम करणार्‍या मजुरांच्या प्रश्नांसाठी थेट जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष याकडे वेधले आहे. एवढेच नाहीतर शहर व परिसरात अनेक वीटभट्टी असून, त्यातील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची तयारी डमाळे यांनी केली आहे. शासन यंत्रणेला जाग यावी यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. बालदिनी काढली फेरी
■ या वीटभट्टीवरील मुलांची अँड.डमाळे व त्यांच्या सहकार्‍यांनी केडगाव परिसरातून फेरी काढून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. बघ्यांची गर्दी पाहून ही मुले हरखून गेली होती. 
--------
वीटभट्टी चालकाचाही हातभार
डमाळे व त्यांच्या सहकार्‍यांनी लिंकरोडवर शेटे यांच्या वीटभट्टीत सुरू केलेल्या वीटभट्टी शाळेसाठी चालक शेटे यांचेही हात सरसावले असून, या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा खोली बांधून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. 

Web Title: 'Bhatbhatti school' filled with gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.