फ्लेमिंगो शिकार प्रकरणी दोघांना जामीन

By Admin | Updated: July 14, 2014 01:43 IST2014-07-14T01:43:39+5:302014-07-14T01:43:39+5:30

केळव्याजवळील दांडी-खराळी गावात फ्लेमिंगो पक्षाची शिकार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर आज हजर केले

Bailout in Flamingo hunting case | फ्लेमिंगो शिकार प्रकरणी दोघांना जामीन

फ्लेमिंगो शिकार प्रकरणी दोघांना जामीन

केळवे-माहिम : केळव्याजवळील दांडी-खराळी गावात फ्लेमिंगो पक्षाची शिकार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर आज हजर केले असता पालघर न्यायालयाने या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यामुळे पक्षी निसर्गपे्रमी मात्र नाराज झाले आहेत.
दांडा-खटाळी गावात शुक्रवार ११ जुलै रोजी फ्लेमिंगो पक्षाच्या थव्यावर गोळीबार करून तीन फ्लेमिंगोंची शिकार करणाऱ्या टेमी खोडावे येथील महेंद्र घरत व विद्याधर किणी या दोन शिकाऱ्यांना पोलीस व वनविभागाने कारवाई करून अटक केली होती. या दोन्ही आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत कलम लावून आज पालघर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना आज जामीनावर सोडले असून पक्षी मित्र व निसर्गप्रेमींकडून या बाबत नापसंती व्यक्त करण्यात आली आहे.
फ्लेमिंगो हा विदेशी पक्षी असून पावसाळ्याच्या सुमारास केळवे व परिसरातील खांजण भागात हे पक्षी आपले खाद्य शोधत येतात. पावसाळ्याच्या वेळेत या खांजण भागात छोटे मासे, खेकडे व जलचर मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने फ्लेमिंगो दरवर्षी या परिसरात येतात.
उंच मान, टोकदार चोच, लांबलचक पाय, पंखावर लाल काळ्या रंगाची छटा असलेल्या या सुंदर पक्षाला रोहिणी नावानेही संबोधले जाते. थव्याथव्याने भक्ष शोधत येणाऱ्या या पक्ष्याचा थवा बघण्यास मिळणे म्हणजे एक विलक्षण आनंद असतो व ग्रामस्थ पावसाळ्याच्या वेळेस हे दृष्य पाहण्यासाठी आतुर असतात. तर पक्षीमित्र, निसर्गप्रेमी दुर्बिणीच्या सहाय्याने या पक्षाच्या हालचाली तासनतास पाहत असतात.
खांजण जागेबरोबरच विस्तुत तथ्यामध्येही हे पक्षी पहावयास मिळतात. शुक्रवारी या सुंदर फ्लेमिंगो पक्ष्याच्या झालेल्या शिकार प्रकरणामुळे अनेकांना हुरहूर लागून गेली व अशा या निंदनीय प्रकारामुळे विदेशातुन येणारे हे पाहुणे कायमचे तर आपले येणे बंद करणार नाही ना अशी अनेकांच्या मनात शंका आली आणि सर्वांनीच या प्रकाराबाबत कडक कारवाई व्हावी अशी एकच इच्छा सर्वांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Bailout in Flamingo hunting case