अलीकडच्या काळात मोठ्या धुमधडाक्यात लग्न केली जातात, लग्नात लाखोंचा खर्च केला जातो. मात्र अवघ्या २ हजारात कोर्टात लग्न करणारे आयएएस युवराज मरमट आणि आयपीएस पी. मोनिका यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. हे जोडपे माध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर त्यांच्याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. युवराज आणि मोनिका या दोघांनी २०२१ साली UPSC परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर २०२३ साली कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केले.
युवराज मरमट हा राजस्थानमधील गंगानगर भागात राहणारा आहे. युवराजने बनारस हिंदू विश्वविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. UPSC पास करण्यापूर्वी त्याने इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेसमध्ये यश मिळवले आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये काम केले. युवराजचा नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याने २०१६ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली होती. मात्र पहिल्याच प्रयत्नात त्याला अपयश आले. त्यानंतर २०२१ मध्ये त्याच्या सहाव्या प्रयत्नातच त्याला अपेक्षित यश मिळाले. त्याने ऑल इंडिया रँक ४५८ (AIR) ४५८ मिळवले. २०२३ मध्ये लग्नाच्या वेळी तो छत्तीसगडमधील रायगड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर होता.
तर दुसरीकडे तेलंगणा येथे राहणारी पी मोनिकाची पार्श्वभूमी वैद्यकीय राहिली आहे. तिने फार्माकोलॉजीत पदवीचं शिक्षण घेतले. त्याशिवाय तिला खेळात आणि संगातीत विशेष रस आहे. मोनिकाने २०२१ साली UPSC परीक्षेत ६३७ ऑल इंडिया रँक मिळवला. या रँकसह तिची भारतीय पोलीस दलासाठी निवड झाली. युवराज आणि मोनिकाच्या नात्याची सुरुवात मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) मध्ये झाली. प्रशिक्षणादरम्यान येथेच त्यांची मैत्री झाली आणि कालांतराने त्याचे प्रेमात रूपांतरित झाले. लग्नानंतर युवराजने केडर बदलण्यासाठी अर्ज केला. आता दोन्ही अधिकारी तेलंगणा केडरमध्ये तैनात आहेत.