मंगळुरू: हेल्मेट घालून एखादी व्यक्ती रिक्षा चालवत असल्याचं तुम्ही पाहिलंय का? रिक्षा चालकांनी हेल्मेट घालून रिक्षा चालवावी, असा नियम तुम्ही कधी ऐकलाय का? नाही ना. मात्र कर्नाटकमधील मंगळुरूत एका रिक्षा चालकाकडून वाहतूक पोलिसांनी 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवल्यानं आणि हेल्मेट न घातल्यानं दंड आकारण्यात आल्याचं पोलिसांनी चलानमध्ये म्हटलं आहे. दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अत्यावश्यक असतं. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांकडून वाहतूक पोलीस दंडदेखील वसूल करतात. मात्र कर्नाटकमधील मंगळुरूच्या पुत्तूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता यापेक्षा मोठी आहे. या पोलिसांनी हेल्मेट न घातल्यानं एका रिक्षाचालकाला दंड केला आहे. हेल्मेट न घातल्यानं आणि तीनपेक्षा अधिक प्रवासी रिक्षात बसवल्यानं दंड आकारत असल्याचं पोलिसांनी चलानमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी आकारलेल्या दंडाची पावती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पोलिसांनी रिक्षाचालकाला दिलेल्या पावतीचा क्रमांक पीटीआर-94807159 असा आहे. या पावतीवरील नियम मोडल्याच्या रकान्यात 'हेल्मेट नाही', असा उल्लेख आहे. याशिवाय रिक्षाचालकानं नऊ शाळकरी विद्यार्थ्यांना रिक्षात बसवलं होतं, असंदेखील वाहतूक पोलिसांनी पावतीमध्ये म्हटलं आहे. मात्र रिक्षाचालकानं हेल्मेट परिधान केलं नाही म्हणून पावती कशी फाडली जाते? रिक्षा चालवण्याचा आणि हेल्मेटचा संबंध काय?, असे प्रश्न सध्या सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत.
अजब! हेल्मेट न घातल्यानं रिक्षा चालकाला भरावा लागला 700 रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 17:33 IST