प्रयागराज - उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून तिथं साधू, संत, नागा साधू यांची मोठ्या संख्येने हजेरी आहे. नागा साधू सामान्यत: खूप कमी दिसून येतात. परंतु महाकुंभ येथे नागा साधूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. नागा साधू यांचं जीवन रहस्यमय असते. त्यांचे जीवन ते मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट गूढ असते. नागा साधू यांच्या जीवनाबद्दल अनेकांना जाणून घेण्याची उत्कंठा असते त्यात नागा साधू यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसे करतात हा प्रश्नही अनेकांना पडला असेल. त्याचे उत्तर पुढे तुम्हाला वाचायला मिळेल.
नागा साधू बनण्यासाठी घोर तपस्या करावी लागते. नागा साधू जिवंत असतानाच स्वत:चे पिंडदान करतात. हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात ज्याचे पालन सगळ्यांकडून केले जाते. त्यातील एक अखेरचं अंत्यसंस्कार. माणसाच्या मृत्यूनंतर त्यांचं पिंडदान करण्याची प्रथा आहे. मात्र नागा साधू यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत तर मृत्यूनंतर त्यांची समाधी करतात. त्यांच्या मृतदेहाला अग्नी दिला जात नाही कारण असं करणे दोष मानला जातो. नागा साधू यांनी आधीच स्वत:चे जीवन संपवलेले असते असं त्यामागचं कारण सांगितले जाते.
पिंडदान केल्यानंतरच ते नागा साधू बनतात त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर पिंडदान आणि मुखाग्नी दिला जात नाही. त्यांना भू किंवा जलसमाधी दिली जाते. समाधी देण्यापूर्वी त्यांना स्नान घातले जाते. त्यानंतर मंत्रोच्चारण करून समाधी दिली जाते. जेव्हा नागा साधूचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या शरीरावर भस्म लावला जातो. भगवे कपडे टाकले जातात. समाधी घेतल्यानंतर त्या ठिकाणावर सनातन निशाण बनवले जाते जेणेकरून लोकांकडून तिथे अस्वच्छता होऊ नये. नागा साधूंना पूर्ण मानसन्मानाने अखेरचा निरोप दिला जातो. नागा साधू यांना धर्म रक्षकही बोलले जाते.
दरम्यान, ऐतिहासिक दाखले तपासायचे झाल्यास नागा साधू यांचा इतिहास फार जुना आहे. आदि गुरू शंकराचार्य यांनी नागा योद्धांची सेना तयार केली होती. शंकराचार्यांनी बाहेरील आक्रमणापासून पवित्र धर्मस्थळे, धार्मिक ग्रंथ यांच्या रक्षणाची जबाबदारी या नागा योद्धांवर दिली होती. धर्माच्या रक्षणासाठी एका हातात शास्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेणे गरजेचे आहे असा संदेश शंकराचार्यांना भारतवर्षाला द्यायचा होता. हाच संदेश घेऊन नागा साधू देशाच्या कानाकोपऱ्यात धार्मिक कार्यक्रमात पोहचतात.