चोरीच्या मार्गाने आले ५० टन सोने

By Admin | Updated: May 21, 2014 02:19 IST2014-05-21T02:18:06+5:302014-05-21T02:19:45+5:30

सरकारने आयातीवर लादलेल्या निर्बंधांमुळे चोरीच्या मार्गाने देशात येणार्‍या सोन्यामध्ये वाढ झाली आहे.

50 tons of gold came from a stolen way | चोरीच्या मार्गाने आले ५० टन सोने

चोरीच्या मार्गाने आले ५० टन सोने

नवी दिल्ली : सरकारने आयातीवर लादलेल्या निर्बंधांमुळे चोरीच्या मार्गाने देशात येणार्‍या सोन्यामध्ये वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात ५० टन सोने चोरीच्या मार्गाने आल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या अहवालात म्हटले आहे. सन २०१३मध्ये तस्करीद्वारे भारतात २०० टन सोने आल्याची शक्यता कौन्सिलने याआधी व्यक्त केली होती. सोन्याच्या मागणीतील बदलाबाबत वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जाहीर केलेल्या एका अहवालाच्या पार्श्वभूमीवर कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम् यांनी ही माहिती दिली. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवार ते मार्च) देशात सुमारे ५० टन सोने हे चोरीच्या मार्गाने आले असण्याचा अंदाज आहे. सोन्याच्या देशांतर्गत मागणीपैकी सुमारे २० ते २५ टक्के मागणी ही चोरीच्या मार्गाने येणार्‍या सोन्यामार्फत पूर्ण केली जात असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. भारतात अनधिकृत मार्गाने दाखल होत असलेल्या सोन्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून त्याचा फटका प्रामाणिकपणे व्यवहार करणार्‍यांना बसत असल्याचे सोमसुंदरम् यांनी स्पष्ट केले. भारत मुख्यत: मध्य-पूर्वेतील देशांकडून सोन्याच्या दागिन्यांची आयात करीत असतो. सध्या या देशांमध्येही सोन्याचे भाव वाढले असल्याने वाढत्या आयातीला त्यामुळे खीळ बसताना दिसत आहे. सोन्याची चोरटी आयात थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केंद्र सरकारने केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 50 tons of gold came from a stolen way