युवावर्गाने लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:32+5:302021-02-05T05:58:32+5:30
जळगाव : सुदृढ लोकशाहीमुळे देशाचा विकास होत असल्याने लोकशाहीची मूल्ये जोपासली व जतन केली पाहिजे. याकरिता तरुणांनी जागरूक राहणे ...

युवावर्गाने लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करावी
जळगाव : सुदृढ लोकशाहीमुळे देशाचा विकास होत असल्याने लोकशाहीची मूल्ये जोपासली व जतन केली पाहिजे. याकरिता तरुणांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिवसाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला. त्यावेळी न्या. जगमलानी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या पद्मश्री नीलिमा मिश्रा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदींची उपस्थिती होती.
मतदानाबाबत जागरूक राहिले पाहिजे
पद्मश्री नीलिमा मिश्रा म्हणाल्या की, भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांसोबतच सर्व नागरिकांनी मतदानाबाबत जागरूक राहिले पाहिजे. कुलगुरू प्रा. पाटील म्हणाले, भारतीय लोकशाही उज्ज्वल परंपरा आहे. ती अधिक बळकट झाली पाहिजे याकरिता प्रत्येक पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करुन मतदान केले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा वाणी यांनी तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी मानले.