लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या कोकणात जाऊन आवश्यक साहित्याच्या वितरणासह घर, मंदिरांची साफसफाई करण्यासाठी जळगावातील तरुण दिवस-रात्र झटत असून त्यांच्या या सेवाभावाने कोकणवासीय भारावून गेले आहेत. गावामध्ये वेगवेगळे काम करण्यासह रुग्णवाहिकेसोबत जाऊन गावोगावी आरोग्य तपासणीस हातभार तसेच औषध वितरणाचे काम हे तरुण करीत आहेत. यामध्ये सेवारथ परिवार, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाच्या कार्यर्त्यांचा समावेश आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरं, दुकाने, मंदिर पाण्यात बुडाली. आता पूर ओसरला असला तरी गावात चिखल, केरकचरा कायम आहे. घरातील सर्व नष्ट झाल्याने पूरग्रस्तांना अन्न, वस्त्रासह त्यांच्या मदतीसाठी झटणाऱ्या हातांचीही गरज आहे. ही गरज ओळखून जळगावातील सेवारथ परिवार, जीएम फाउंडेशन, पत्रकार संघ यांच्यासह विविध संस्थांनी वेगवेगळे साहित्य पाठविले. या सोबतच या संस्थांमधीलच सेवारथ परिवार तसेच विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते चिपळूण येथे जाऊन सेवाकार्य करीत आहेत.
ज्येष्ठांना मिळाला आधार
जळगावातील १८ तरुण चिपळून येथे गेले असून पूरग्रस्त भागात ते वेगवेगळी जबाबदारी संभाळत आहेत. चिपळूण येथे घरांमध्ये झालेला चिखल काढणे गरजेचे असताना ज्यांच्या घरात तरुण मुले नाही, अशा ज्येष्ठांचे हाल होत आहे. त्या वेळी जळगावातील हे तरुण या ज्येष्ठांच्या मदतीसाठी सरसावले असून त्यांच्या घराची साफसफाई करण्याचे काम हे तरुण करीत आहेत. आतापर्यंत या तरुणांनी १५० घरांची साफसफाई केली असून मंदिरांमध्येही जाऊन स्वच्छता मोहीम राबविली जात आहेत. यात १७ मंदिरांची सफाई करण्यात आली असल्याचे सेवारथ परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.
अडीच हजारावर नागरिकांची तपासणी
पूरग्रस्त भागात आरोग्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी जळगावातूनच एक रुग्णवाहिका पाठविण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन तरुण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन औषधी वितरण करीत आहेत. सोबतच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत असून आतापर्यंत दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० जणांची तपासणी करण्यात आली आहे.
पूरग्रस्त भागात लागणारी आवश्यक ती मदत करण्याची तयारी या तरुणांनी दर्शविली आहे. सोबतच तेथे अजून आवश्यक साहित्य पाठविणार असल्याचे सेवारथ परिवाराचे दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी सांगितले.