कंपनीत कामावर जात असताना ट्रकखाली चिरडून आसोदा येथील तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:17 IST2017-12-26T13:16:42+5:302017-12-26T13:17:50+5:30
जळगाव-औरंगाबाद मार्गावर अपघात

कंपनीत कामावर जात असताना ट्रकखाली चिरडून आसोदा येथील तरुण ठार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26- कंपनीमध्ये कामावर जात असताना ट्रकखाली चिरडल्या गेल्याने आसोदा येथील प्रमोद सुरेश महाजन (40) हे जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे आठवाजेच्या सुमारास जळगाव-औरंगाबाद मार्गावर झाला.
प्रमोद महाजन हे औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला असून नेहमीप्रमाणे ते मंगळवार, 26 रोजी सकाळी दुचाकीने कामावर जात होते. शहरातील अजिंठा चौफुली ओलांडल्यानंतर एका फर्निचर दुकानासमोर ट्रकच्या (क्र. एम.एच. 18, एए - 8036) मागच्या चाकाखाली येऊन ते जागीच ठार झाले. विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते आणि अपघातानंतरही हेल्मेट तसेच राहिले, मात्र डोक्याला जबर फटका बसल्याने डोक्यात रक्त गोठले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. प्रमोद महाजन यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे नातेवाईक तसेच मित्रांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा होता. प्रमोद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.