जळगाव : तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात आरोपी गणेश सखाराग बांगर (३२, रा.मालेगाव) याला मंगळवारी न्यायालयाने दोन वर्षे १० महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.वाय.काळे यांनी दिला आहे.१९ मे २०२० रोजी पीडित मुलगी ही आई-वडील व भावासोबत मुंबई येथून त्यांच्या मुळगावी अकोला येथे जात होती.
शहरातील कालिंका माता मंदिरापुढे जेवण वाटप सुरू असल्यामुळे पीडितासह तिचे कुटूंब जेवण करून सावलीत बसले होते. तेव्हा गणेश बांगर हा तेथे आला. मी सुध्दा अकोला येथे जात आहे, माझ्याकडे मोठे वाहन असून त्याचे टायर फुटले असल्याने दोन तास दुरूस्तीसाठी लागणार आहे, त्यामुळे तू आणि तुझी बहिण माझ्या दुचाकीवर बस, असे तो पीडितेच्या भावाला म्हणाला. नंतर दोघांना घेवून भुसावळकडे निघाला. मात्र, डॉ. उल्हास पाटील मेडिकल महाविद्यालयाजवळ पोलिस उभे असताना बांगर याने पीडितेच्या भावाला रस्त्यात उतरवून पीडितेला घेवून पसार झाला होता. यानंतर भावाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती.पीडित व भावाची साक्ष ठरली महत्वाची...हा खटला तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.वाय.काळे यांच्या न्यायालयात सुरू होता. या खटल्यात सरकारपक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात अल्पवयीन मुलगी, तिचा भाऊ, पंच आणि तपासणी अधिकारी गजानन राठोड, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने साक्षी-पुराव्याअंती आरोपी बांगर याला भादंवि कलम २६३, ३२३ नुसार दोषी धरून मंगळवारी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून गणेश नायकर यांचे सहकार्य लाभले.अशी सुनावली शिक्षा- भादंवि कलम ३६३ खाली २ वर्षे १० महिने साधी कारावासाची शिक्षा व ५०० रूपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.- भादंवि कलम ३२३ खाली ३ महिने साधी कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.- आरोपी हा २६ मे २०२० पासून कारागृहात आहे.