लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : घरी येऊन संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशीही मारहाणीसाठी काही जण घरी आल्यानंतर घाबरलेल्या सागर गणेश खडसे (वय २२, रा.दहिगाव संत, ता.पाचोरा) या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता म्हसावद, ता.जळगाव येथे घडली. दरम्यान, मुलाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या लोकांना अटक केली नाही, तर संपूर्ण कुटुंब विष प्राशन करून आत्महत्या करेल, अशी भूमिका सागरच्या आईने घेतली.
दहिगाव संत येथे सोमवारी दुपारी संदीप रघुनाथ कोळी हा सागरच्या घराजवळ येऊन दारूच्या नशेत शिवीगाळ करीत होता, तेव्हा त्याची आई कल्पनाबाई यांनी त्यास दारू पिऊन येथे यायचे नाही, असे बजावल्याच्या कारणावरून संदीपची बहीण राधाबाई कोळी, मथुराबाई नामदेव शेजवळ, नामदेव भिका शेजवळ यांच्यासह लोहारा, कळमसरा येथील नातेवाइकांनी सागरसह आई, वडील व भावाला मारहाण केली होती. मंगळवारीही काही जण घरी आले होते. त्याच प्रकारातून सागर याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आल्यानंतर जोपर्यंत मारहाण करणारे व बीट अंमलदार यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, त्याशिवाय संपूर्ण कुटुंब आत्महत्या करेल, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने वातावरण तापले होते. दुपारी काही जणांना अटक झाली. त्यानंतर, सायंकाळी पाचोरा पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी कारवाईची माहिती दिली, तेव्हा सात वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला.