क्रेडिट कार्डची माहिती विचारून तरुणाची ८० हजारांत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:25+5:302021-09-04T04:20:25+5:30
जळगाव : ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती जाणून घेऊन एका तरुणाच्या बँक खात्यातून ८० हजार ...

क्रेडिट कार्डची माहिती विचारून तरुणाची ८० हजारांत फसवणूक
जळगाव : ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती जाणून घेऊन एका तरुणाच्या बँक खात्यातून ८० हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैय्यद वसीम आबिद अली हे अक्सानगरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एप्रिल महिन्यात त्यांना एका मोबाईल क्रमांवरून फोन आला व आपण ॲक्सिस बँकेतून बोलत असून, तुम्हाला बाहेर फिरण्यासाठी आठ हजार रुपयांचे पॅकेज आले असून, त्यासाठी तुम्हाला आठ हजार आधी भरावे लागतील व नंतर चार हजार रुपये सूट मिळेल असे सांगण्यात आले. त्यानुसार सैय्यद वसीम यांनी आठ हजार रुपये पाठविले. काही दिवसांनंतर सैय्यद वसीम यांना पोस्टाद्वारे प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दोन कूपन व एक घड्याळ आले. परंतु, सैय्यद हे कुठेही फिरण्यास गेले नाही़ त्यामुळे ते कुपन पडून होते.
क्रेडिट कार्डचा क्रमांक सांगितला अन् बँकेतून रक्कम गायब
दरम्यान, बुधवारी दुपारी १२ वाजता पुन्हा एका मोबाईल क्रमांकावरून सैय्यद वसीम आबिद अली यांना फोन आला. आपण ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला कुणीतरी कूपन पाठवून फसवणूक केल्याचे सांगून इतरांच्याही तक्रारी आल्या आहे. फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत करीत असून, तुमचा क्रेडिट कार्डचा क्रमांक सांगा असे सांगितले. त्यावर सैय्यद वसीम यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डचा १६ अंकी क्रमांक सांगितला आणि काही वेळातचं त्यांच्या क्रेडिट कार्डच्या खात्यातून ५० हजार व ३० हजार रुपये असे एकूण ८० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर सैय्यद वसीम यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.