आपण म्हणजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 03:54 PM2019-08-28T15:54:24+5:302019-08-28T15:56:07+5:30

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ललित या सदरात अभ्यासक जयंत पाटील लिहिताहेत खुसखुशीत ‘आपण म्हणजे...’

You mean ... | आपण म्हणजे...

आपण म्हणजे...

Next

मी पूर्वी अगदी लँडलाईन काळात मला आवडलेल्या, डायरीत लिहून ठेवलेल्या कविता मित्रांना ऐकवत असे. घरात अनेक नियतकालिके-अनियतकालिके यायची. मंगेश (काळे) मुळे ‘शब्द’वाला रमेश, 'अभिदानंतर'वाला हेमंत दिवटे हे ओळखीचे झालेले... ते हे अंक पाठवायचे.
ेएकदा ‘अभिदानंतर’चा दिवाळी अंक २००१ आलेला. त्यातली ‘आपण म्हणजे’ ही पंकज क्षेमकल्याणीची कविता मी महानोरांना ऐकवली. दादांना कविता आवडली. ते म्हणाले, ‘हा कवी नाशिकला रहातो.’ नंतर काही काळातच नाशिकला जाण्याचा योग आला. राजा पाटेकर आणि मी नाशिकच्या मेनरोडवर भटकत होतो. पाठीला सॅक अडकवलेल्या एका उंचपुऱ्या तरुणाशी माझी राजाने ‘हा पंकज क्षेमकल्याणी’ अशी ओळख करून दिली. मी त्याला म्हणालो, ‘‘तुझी ‘आपण म्हणजे’ ही कविता मी महानोरदादांना ऐकवली. त्यांनाही ती आवडली.’’ पंकजने आनंदाने जागच्या जागी उडी मारुन आनंद साजरा केला. पंढरीचा वारकरी दिंडीत अभंग म्हणताना अशीच उडी मारतात, असा भास झाला. हा कविता पंढरीचा वारकरी पाहताना... पंकजचे नुकतेच लग्न झालेले. त्याची पत्नीही कविता करते हेही कळाले... आम्ही घरी गेलो. त्या सावळ्या रखुमाईचे मन:पूर्वक हसू जगण्याचा सन्मान करणारे...

पंकजची कविता :
‘आपण म्हणजे पाच फूट नऊ इंचाचा
एक्झिबिशन हॉल असतो
प्रदर्शन भरवायचंय आपल्याला स्वत:चं
ऐसपैस करूया स्वत:ला म्हणजे थोडंतरी मोकळं मोकळं वाटेल
गोळा करा आपल्याकडे असलेल्या गोष्टी
नसलेल्या गोष्टींचा आभास निर्माण करा.
मांडा प्रदर्शनात
शाळेत श्रीगणेशा गिरवलेली पाटी, पाढ्यांची अंकलिपी,
गोष्टींची पुस्तकं, गायकवाड मास्तरांची छडी आणि
बबनच्या जिंकलेल्या ४१ गोट्या
प्रदर्शनात ठेवा
पंक्चर झालेली नवी कोरी सायकल, आठवतील त्या
वर्गमित्रांचे चेहरे, पोपटाच्या आकाराचं खोडरबर,
शाळेबाहेरचा रंगीत बर्फवाला
विचारा स्वत:ला ओक मॅडमचा चेहरा अजून आठवतो का?
हरकत नाही प्रदर्शनात ठेवायला
रंगीत दिवसरात्रीच्या अनेक गोष्टी, रात्री-बेरात्री केलेल्या बेभान
प्रवासाची तिकिटं, थंडगार रात्रीनंतर उगवलेल्या पहाटेसारखी
उबदार हसणारी मैत्रिण, तिच्या आत्महत्येची बातमी देणारं तिच्या भावाचं पत्र,
प्रेयसीची दंडाभोवतीची घट्ट मिठी,
पावसात भिजतानाची मनात सतत वाजणारी एकटेपणाची सारंगी
अनोळखी उन्हाचा डूम
उलटसुलट विचारांचा त्रिताल आणि कवितांची वहीसुद्धा
आणि खाली लिहायला विसरायचं नाही
कृपया येथील वस्तूंच्या किमती विचारू नयेत.
-जयंत साहेबराव पाटील, जळगाव
 

Web Title: You mean ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.